अफगाणिस्तान शनिवारी तीव्र भूकंपाच्या झटक्यांना हादरला. भूकंपाच्या ६.३ रिश्टर स्केलचा जोरदार झटका नागरिकांनी अनुभवला. यामध्ये आतापर्यंत २००० नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती देखील वर्तवली जात आहे. जीवितहानीसह मोठी वित्तहानी देखील झाली आहे. अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भूकंपाचं केंद्र हेरात शहराच्या वायव्येस ४० किलोमीटर अंतरावर होते.
स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२.११ वाजता ६.१ तीव्रतेचा पहिला भूकंप झाला. त्यानंतर १२.१९ वाजता ५.६ तीव्रतेचा आणि तिसरा भूकंप १२.४२ वाजता 6.3 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. दरम्यान, हेरातच्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास भूकंपाचे पाच धक्के जाणवले. तीव्र झटक्यानंतर नागरिकांना घराबाहेर, ऑफिसबाहेर पडत मोकळ्या जागी धाव घेतली. सोशल मीडियावरील भूकंपानंतरच्या भयावह स्थितीची अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेरात शहरातील शेकडो इमारती कोसळल्याचं समोर आलं आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार फराह आणि बादघिस प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले.