कणकवली :मसुरे-डांगमोडे गावाचे सुपुत्र श्री. दिपक मुकुंद ठाकूर (रहाणार: बोरीवली -मुंबई) यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे घेतल्या गेलेल्या ‘ज्योतिषशास्त्री’ परीक्षेत विशेषश्रेणी (७९%)मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यांचा मुंबई विभागातून दुसरा क्रमांक आलेला असून त्यांनी ज्योतिषगणित व निबंधलेखन या दोन्ही विषयांत दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे. या परीक्षेसाठी स्व.थिटेसरांच्या चेंबूर येथील संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ते गेली ३ वर्षे अभ्यास करीत होते.
स्टेट बँकेत १९७९ साली क्लार्क म्हणून रुजू झालेले श्री. दिपक ठाकूर यांनी मार्च २००१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि कृष्णमूर्ती -ज्योतिषशास्त्राचे धडे डॉ. द. ग. सावंत सरांकडे गिरवले. नंतर ज्योतिषाचार्य श्री.विजय हजारी सरांकडे ज्योतिष शास्त्राबरोबरच वास्तुशास्त्र, टॅरोकार्ड, यंत्र-तंत्र-मंत्र या शास्त्रांचाही अभ्यास केला. ज्योतिष महर्षी स्व.सुनिल गोंधळेकर यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच रेकी मास्टर सौ. अमिता बिर्जेंकडे रेकीचं रितसर प्रशिक्षण घेतले होते.
श्री. दिपक ठाकूर यांनी वयाच्या ६५व्या वर्षी ‘ज्योतिषशास्त्री’ पदवी संपादन करताना मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे. या सिंधुपुत्राचे ‘प्रहार’ दैनिकातर्फै मनःपूर्वक अभिनंदन!