लांजा नगरपंचायतीच्या नूतन मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्या भूमिकेकडे लांजावासियांचे लक्ष
लांजा (प्रतिनिधी) लांजा शहरातील साटवली रोड क्रमांक १६८ आणि लांजा शाळा नंबर पाच वरील अनधिकृत १६ खोके धारकांवर लांजा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे या सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी कारवाई करणार ?की राजकीय दबावापोटी आपली कारवाई मागे घेणार याकडे आता लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित मुख्याधिकारी श्रीमती राणे यांनी लांजा शहरातील अनधिकृत खोकेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील लांजा शाळा नंबर पाच आणि लांजा साटवळी ग्रामीण मार्ग १६८ वर उभारण्यात आलेल्या १६ अनधिकृत खोकेधारकांना मुख्याधिकारी श्रीमती राणे यांनी तीन ऑक्टोबर रोजी नोटीसा बजावल्या होत्या आणि पुढील तीन दिवसात संबंधित अनधिकृत खोकेधारकांनी आपले खोके उचलावेत अन्यथा नगरपंचायतीमार्फत या खोके धारकांवर कारवाई करण्यात येईल असे अशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. या धडक मोहीमेचे लांजा वासियांतून स्वागत केले जात होते.दरम्यान शनिवार आणि रविवारी या दोन दिवस सुट्टीचा दिवस असल्याने या अनधिकृत खोकेधारकांवरील कारवाई थांबली होती.
दरम्यानच्या कालावधीत या १६ अनधिकृत खोकेधारकानी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावेळी आमदार राजन साळवी यांनी या खोके धारकांना आपण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून कारवाई न थांबल्यास आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे या खोके धारकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचीही भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गार्हाणे मांडले होते.
त्यामुळे या संपूर्ण कारवाईत मुख्याधिकारी राणे यांच्यावर खोकेधारकांवरील कारवाई थांबवण्यासाठी प्रचंड राजकीय दबाव आहे .अशा परिस्थितीत श्रीमती राणे या राजकीय दबाव झुगारून संबंधित खोकेधारकांवर सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी कारवाई करुन आपले कर्तव्य बजावणार की राजकीय दबावातून ही कारवाई मागे घेणार? याकडे आता लांजावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी नऊ ऑक्टोबर रोजी नगरपंचायत प्रशासकीय कामकाजावर सुरुवात होणार असल्याने या दिवशी खोके धारकांना बजावण्यात आलेल्या नोटिसीची मुदत देखील संपत आल्याने आता मुख्याधिकारी या खोकेधारकांवर कारवाई करणार? की कारवाई मागे घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्याधिकारी हर्षला राणे या कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्या कोणत्याही दबावाला बळी पडून आपली कारवाई थांबवणार नाहीत असे बोलले जात आहे.









