पोस्टाच्या विमा योजनेमुळे सिंधुदुर्गात 5 कोटी 25 लाखाचे ग्राहकांचे संरक्षण.

समृद्धी महिला योजनेत बांबुळी राज्यात सर्वोत्तम

सिंधुदुर्गातील ग्राहकांचा पोस्टावरील विश्वास वाढला – अधीक्षक, मयुरेश कोल्हे

सिंधुनगरी | प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय डाक सप्ताह मध्ये पोस्टाने राबविलेल्या विविध उपक्रमात जिल्ह्यातील ग्राहकाने चांगलीच पसंती दिली आहे. जिल्ह्यातील ग्राहकाने उतरवलेल्या विमा पॉलिसीमुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पाच कोटी 25 लाखाचे संरक्षण मिळणार आहे. महिला बचत प्रमाणपत्रांमध्येही या सप्ताहात १२१४ महिलांची खाती उघडण्यात आली आहेत. यात दोन वर्षासाठी महिलांकरता चक्रवाढ व्याजदराने साडेसात टक्के परतफेड मिळणार आहे. याच योजनेत कुडाळ तालुक्यातील बांबुळी या गावाने जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांमुळे भारतीय पोस्टाचा विश्वास आणखी वाढत आहे. अशी माहिती सिंधुनगरी येथील मुख्य डाकघराचे अधीक्षक मयुरेश कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोस्टाचे अधिकारी बालाजी मुंडे, योगेश फुले हेही उपस्थित होते.

राष्ट्रीय डाक सप्ताह निमित्त देशभर 9 ते 13 ऑक्टोंबर या काळात डाक सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा सप्ताह झाला. जिल्ह्यातील ग्राहकानी पोस्टाने राबविलेल्या विविध उपक्रमात चांगला प्रतिसाद देत पोस्टावरील विश्वास आणखी वाढल्याचे दाखवून दिले. याबाबतची माहिती देण्यासाठी येथील अधीक्षक मयुरेश कोल्हे यांनी ही पत्रकार परिषद घेत माहिती दिली.महिलांसाठी पोस्ट खात्याने साडे सात टक्क्याची चक्रवाढ व्याज देणारी महिला बचत पत्र योजनेला या जिल्हातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. या योजनेत जिल्ह्यातील 1,214 महिलांनी या योजनेत सहभाग घेतला. 1000 ते दोन लाखापर्यंत दोन वर्षासाठी ठेव रक्कम ठेवल्यास महिलांना साडेसात टक्के चक्रवाढ दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे. या योजनेत महिला बचत गटांची मीटिंग घेऊन कुडाळ तालुक्यातील बांबुळी गावाने 200 च्या वर महिलांची ही बचत खाते सुरू केली आहेत. व हा गाव सिंधुदुर्ग शहर राज्यात सर्वोत्तम ठरला आहे असेही अधीक्षक महेश कोल्हे म्हणाले.

आधार कॅम्पला ही प्रतिसाद

आधार कार्ड ही नागरिकांची गरज असून नवीन आधार नोंदणी जुन्या आधार मधील दुरुस्त्या बायोमेट्रिक अपडेट ही कामे नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. पोस्टाकडे 14 युनिट सध्या सुरू असून ज्या भागात नागरिकांना ही सुविधा सहजासहजी उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी आधार नोंदणीसाठी कॅम्पचे आयोजन करून नागरिकांना ही सेवा पुरविली जात आहे. या डाक सप्ताहाच्या काळात 18 ठिकाणी काम करण्यात आले असून जिल्ह्यातील या भागात अनेक नागरिकांना आधारची सुविधा उपलब्ध करून दिले आहे असेही श्री कोल्हे म्हणाले.

पोस्टाच्या विमा योजनेला ही प्रतिसाद
एलआयसीच्या धर्तीवर नागरिकांना विमा संरक्षण देणारी पोस्टाची चांगली योजना असून त्याला हे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांचा 31 लाख 52 हजार रुपयांचा प्रीमियम असून तब्बल 5 कोटी 25 लाखाचे विमा संरक्षण ग्राहकांना मिळणार आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. या अभियान काळात विद्यार्थ्यांची ही खाती उघडण्यात आली. यात जिल्ह्यातील 75 शाळांना भेटी देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचीही 2273 बचत खाते उघडण्यात आली आहेत असेही मयुरेश कोल्हे यांनी सांगितले.

डाक विभागाचा कणा असलेली टपाल सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी व वितरण अधिक चांगले होण्यासाठी तालुक्याच्या पोस्ट कार्यालयात पोस्टमन व वितरण प्रणालीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे कार्य शिबीर मा. डाक अधिक्षक यांचे उपस्थितीत घेण्यात आले. “ढाई आखर पत्र लेखन” स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत जिल्ह्यातील विविध 75 शाळांना भेटी देण्यात आल्या, यात 3,151 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन “नए भारत के लिए डिजीटल इंडिया” या विषयावर आपले निबंध सादर केले.