माझी कोणाशीही राजकीय स्पर्धा नाही समाजसेवक म्हणूनच काम करणार : विशाल परब

भविष्यात युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न

माझे राजकीय भवितव्य येणारा काळच ठरवेल

सावंतवाडी । प्रतिनिधी : समाजसेवक म्हणून जनतेसाठी काम करणे हाच माझा नेहमी उद्देश आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मी कधीच कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीत. त्यामुळे आमदार किंवा खासदार याबाबत होणारी चर्चा ही केवळ चर्चाच आहे.
मी कोणाचा राजकीय स्पर्धक नाही किंवा मला कोणाशीही स्पर्धा करायची नाही. मी भाजपचा छोटा कार्यकर्ता आहे.त्यामुळे माझे राजकीय भवितव्य हा येणारा काळच ठरवेल. ज्या युवकांनी मला आयडॉल ठरवले त्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी आगामी काळात जिल्ह्यात आयटी पार्क तसेच पर्यटनावर आधारीत प्रकल्प उभे करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सर्वानी पुढे यावे, असे आवाहन भाजपा युवा नेते उद्योजक विशाल परब यांनी केले.
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी सोमवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन विशाल अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित करण्यामागे विशाल परब यांचा राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. शहरात लागलेले बॅनर व व त्यांनी केलेली भाषणे यातून भविष्यात आमदार किंवा खासदारकीसाठी माझा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. परंतु असा कुठलाही हेतू किंवा स्वार्थ या मागे नसून केवळ आणि केवळ जनसेवा आणि समाजसेवक म्हणून मी काम करीत आहे. आपण या आधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येथील जनतेला सहजरित्या पाहताना येणारे कार्यक्रम आयोजित केले आहे. भविष्यातही यापेक्षाही मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील परंतु त्यामध्ये माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नसणार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच कार्यक्रम घेतले नाहीत त्यामुळे मी राजकीय स्पर्धेत आहेत असा गैरसमज कुणी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

माझं राजकीय भवितव्य काय असेल हा येणारा काळच ठरवेल.भविष्यात राजकीय पद मिळाल्यास ते स्वीकारायचे की नाही याचा निश्चितच विचार करेन. कारण पद स्वीकारल्यास त्याला तितका वेळ देणे आवश्यक आहे. तुर्तास तरी मी उद्योजक असून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून या जिल्ह्यात आयटी पार्क सारखे उद्योग आणून या जिल्ह्यातील तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने आपण देश विदेशात फिरत असतो. तेथील विविधता पाहता आपला कोकणातही ती विविधता पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. ज्याप्रमाणे गोवा पर्यटनाच्या माध्यमातून स्पर्धा करत आहे. ती स्पर्धा येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग ही करेल व त्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असेही ते म्हणाले.

माझ्या जीवनाच्या वाटचालीमध्ये मी कधीच कोणाला दुखावलं नाही. मला कोणालाही वाईट बोलायला आवडत नाही. समोरून जर मला कोण वाईट बोललं तर ते मी मनावरही घेत नाही व मी कोणालाही स्पर्धक मानत नाही. स्पर्धा ही स्थानिकांशी आपल्या माणसांची नसावी ती बाहेरच्यांशी असावी असे मी मानतो. त्यामुळे राजकारणात कोणाचा स्पर्धक असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
आठ दिवस ‘विशाल पर्व अभिष्टचिंतन सोहळा ‘ हा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात आला. भारतीय जनता पक्ष तसेच विशाल परब मित्रमंडळाच्यावतीने यासाठी मेहनत घेण्यात आली आणि म्हणूनच या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे आपण आभारी आहोत. माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ज्या ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कोणतीही राजकारण मनात न ठेवता उपस्थिती दर्शवली त्या सर्वांचा आपण आजन्म ऋणी राहीन. वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार यांनी केलेली मदत फार मोलाची होती तसेच या कार्यक्रमाची शान यांनी वाढवली त्या युवक युवतींच्या एकोप्याला सलाम अशा शब्दात त्यांनी सर्वांचे आभार मानले.

राणे कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखालीच माझी वाटचाल : विशाल परब

सावंतवाडीतील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला राणे कुटुंबातील सदस्य काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. त्यामुळे याबाबत कोणीही गैरसमज करू नये. आपल्याला राणे कुटुंबियाकडून फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ते नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आपली वाटचाल असेल, असे विशाल परब यांनी स्पष्ट केले.