शहरातील वाहतुक कोंडी, बेशीस्त पार्किंग आणि बेदकार वाहनचालकांना आळा घालण्याची गरज

नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा नागरिकांची मागणी  

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरात नियमित होणारी वाहतुक कोंडी, शहरात बेदकारपणे वाहन चालविणारे वाहन चालक आणि कुणीही या आणि कुठेही पार्किंग कशा अशा पध्दतीने बेशिस्तपणे केले जाणारे पार्किंग यामुळे राजापुर शहरातील सार्वजनिक शिस्त आणि वाहतुक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य जनतेला आणि खास करून महिला, विद्यार्थी आणि रूग्णांना होत असून यावर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने सुयोग्य नियोजन करून मार्ग काढावा अशी मागणी शहरवासीयांतुन होत आहे.

राजापुर शहरातील जवाहर चौक ते नगर वाचनालय या भागात होणारी वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. तर पुढे जवाहर चौकापासून शिवाजीपथ ते बंदरधक्का रोडवरही वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. बेदकारपणे वाहन चालविणारे वाहन चालक, धुमस्टाईल दुचाकी चालविणारे दुचाकीस्वार आणि बेशिस्तपणे कुठेही कशा प्रकारे लावली जाणारी वाहने यामुळे ही वाहतुक कोंडी होत असून दिवसेंदिवस त्यात अधिक भर पडत आहे.

या एकूणच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नगर परिषद प्रशासनाकडून केवळ नो पार्किंगचे बोर्ड लावले गेले आहेत पण प्रत्यक्षात पार्किंगची योग्य सोयही करण्यात आलेले नाही. न. प. च्या या नो पार्किंग फलकांखालीच अनेकजण आपल्या गाडया पार्क करून बघा तुमच्या नियमांना आंम्ही कशी केराची टोपली दाखवतो असाच संदेश देत आहेत.

शहरातील या बेशिस्त पार्किंग, बेदकारपणे गाडया चालविणारे वाहन चालक, धुमस्टाईल दुचाकी चालविणारे अनेक अल्पवयीन दुचाकीस्वार यांच्यावर देखील पोलीसांनी कारवाई करणे आवश्यक आहे. कोणतीच कारवाई होत नसल्याने आमचे कोणीच काही करू शकत नाही अशा थाटात हे वाहन चालक वागत आहेत. शहर बाजारपेठेत अस्ताव्यस्त गाडया लावल्या जात आहेत. तर शिवाजीपथ ते बंदरधक्का या रस्त्यावर दोन्ही बाजुला लावलेली वाहने पाहिली की हा रस्ता वाहतुकीसाठी की वाहन पार्किंगसाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावर तर पोलीस स्थानकासमोरच मोठया प्रमाणावर दोन्ही बाजुला वाहनांचे पार्किंग केले जात आहे.

राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी राजापूरकरांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या आणि गेले कित्येक वर्ष भिजत पडलेल्या या वाहतुक कोंडी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.