रत्नागिरीत कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात मोठ्या उत्साहात शारदोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी हभप प्रवीण मुळ्ये यांनी विद्यामंदिरात शारदोत्सवाची आवश्यकता या विषयावर विद्यार्थ्यांना सुरेख मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कीर्तनावेळी बुवा मुळ्ये यांना टाळ्या वाजवून उत्तम साथ दिली. शाळेतील ५५० विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक यात आनंदाने सहभागी झाले असून शारदेची आरती करण्यात विद्यार्थी रंगले आहेत.

शारदामातेसोबत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असल्यामुळे जी- २० ला केंद्रबिंदू मानून सजावट केली आहे. वसुधैव कुटुंबकम् या संकल्पनेवर सजावट साकारली आहे. तसेच पालकांनी भरडधान्यापासून देवीची रंगावली साकारली आहे. उद्घाटन कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम व सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.

पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती आणि माता पालक संघामार्फत शारदोत्सवात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शारदोत्सवामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, कार्यानुभव, पालकांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, आरती, नाट्यछटा स्पर्धा आणि पाटीपूजन आदींचे आयोजन केले आहे. भरडधान्य पाककृती स्पर्धा, हे कार्यक्रमही होणार आहेत. तसेच सांगता कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार शाळेचे शिक्षक सुधीर शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.