गणित ऑलिम्पिक स्पर्धेत मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात अव्वल

मसुरे | झुंजार पेडणेकर :    अध्ययन संस्था, मुंबई आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय गणित ऑलिंपिक स्पर्धेत मसुरे देऊळवाडा शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

अध्ययन संस्था, मुंबई ही संस्था जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणित विषयातील विविध संबोध स्पष्ट करण्यासाठी विविध अध्यापन साहित्याचा पुरवठा करुन शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यानंतर विद्यार्थ्यांची लेखी चाचणी व मौखिक प्रश्नमंजुषा घेतली जाते. इयत्ता ६वी व ७वीच्या विद्यार्थ्यांची मापन या घटकावर मालवण तालुकास्तरीय ऑलिंपिक स्पर्धा सेवांगण मालवण येथे संपन्न झाली. यात मसुरे देऊळवाडा शाळेतील दहा विद्यार्थी सहभागी झाले होते. यशश्री ताम्हणकर, स्वराज बागवे, नील बागवे, रुद्र परब, सेजल काळसेकर, तेजस्वी मेस्त्री, दुर्वा परब, युवराज परब, आर्या भोगले, दुर्वा मेस्त्री या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा व प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.

यशस्वी विद्यार्थ्यांना अध्ययन संस्था व शिक्षण विभागाच्या वतीने संयोजक सामंत, मार्गदर्शक व शिक्षक यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, शिक्षक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.