देऊळवाडा सातेरी मंदिर येथे 400 ताटे भेट

माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दत्ता सामंत यांचे सेवाकार्य

मालवण | प्रतिनिधी : देऊळवाडा सातेरी मंदिर येथे माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी 400 ताटे (डिश) मंदिरास भेट स्वरूपात दिली आहेत. नवरात्र उत्सव काळात मंदिरात दर दिवशी भाविकांना महाप्रसाद असतो. तसेच अन्य कार्यक्रमही असतात. सर्वांचा विचार करता भाविकांना प्रसाद (भोजन) व्यवस्थेसाठी ताटे (डिश) उपलब्ध झाल्यास सोईचे ठरेल. याबाबत माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले. दत्ता सामंत यांनी तात्काळ 400 ताटे मंदिरास भेट देण्याचे मान्य केले. त्यानुसार गुरुवारी सकाळी सातेरी मंदिर येथे समस्त सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार यांच्या उपस्थितीत ताटे भेट स्वरूपात देण्यात आली. निलेश राणे बहुमताने आमदार होऊदेत असे साकडे यावेळी दत्ता सामंत यांच्या माध्यमातून देवी चरणी घालण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, संजय लुडबे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, राजू बिडये, कमलाकर कोचरेकर यासह सातेरी मित्रमंडळ, घाडी परिवार, गावकर परिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सातेरी देवी हे जागृत देवस्थान आहे. देवीने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. यापुढेही देवीच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू. मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याचा आमचा मानस आहे. सातेरी देवी ती सेवाही पूर्ण करून घेईल. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.