मूकबधिर मुली वरील अत्याचार प्रकरणी हूमरमळा येथील मंगेश दशरथ परब ( कासले ) याला दहा वर्षे कारावास

सिंधुनगरी प्रतिनिधी

मूकबधिर मुलीला उचलून नेत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी मंगेश दशरथ परब (कासले) रा. हुमरमाळा याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
आरोपी मंगेश दशरथ परब (कासले) याने हुमरमळा येथे रस्त्यावर फिरत असलेल्या एका मूकबधिर मुलीला जबरदस्ती उचलून नेत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार २०२० मध्ये घडला होता. याप्रकरणी मंगेश याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भा. द. वि कलम ३७६ (१), ३७६ (२) एल अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची संपूर्ण सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांचे न्यायालयात झाली. यावेळी आठ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात मूकबधिर साक्षीदाराचा पुरावा गजानन तोडकरी यांनी कौशल्याने रेकॉर्डवर आणलेला होता. साक्ष आणि पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपी मंगेश याला भा द वि कलम ३७६ (१), अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व कलम ३७६(२)(एल) अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल पाटील यांनी केला होता. केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता तसेच तेलंगणा राज्यातून पिडीतेला आणण्याकरिता पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर व सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.