गँगरेप प्रकरणातील आरोपींना २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी.!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस मर्डर, हाणामारी सारखे गुन्हे घडत असताना कणकवली तालुक्यात मात्र खळबळ उडविणारी घटना घडली आहे. प्रियकरानेच आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची ही घटना आहे. याप्रकरणी बाळकृष्ण ( बाळू ) सदानंद तांबे (वय – २६, रा. केळवली, राजापूर, सध्या रा. नाद वैभववाडी ), शैलेश शांताराम तांबे ( वय – ३४,रा. दारूम ), गणेश प्रकाश गुरव (वय – २०, रा. शिरवली ) यांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी नंतर अटक केली आहे. तर त्यांच्यावर पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी बाळकृष्ण ( बाळू ) सदानंद तांबे याची पीडित युवतीसोबत ऑगस्ट महिन्यात ओळख झाली. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढत जाऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती युवती बाळकृष्ण तांबे याला १४ ऑक्टोबर रोजी भेटण्यासाठी तळेरे येथे आली. त्यांनतर काही वेळ तिने बाळकृष्ण याची वाट पाहिली. बाळकृष्ण दु. २ वाजता तळेरे बस स्थानकावर पोहोचला. दोघांनी मिळून तळेरे बस स्थानकासमोरील एका हॉटेल मध्ये चायनीज खाल्ले. त्यानंतर ते दोघेही देवगड येथे बसने फिरायला गेले. सायंकाळी ७ वाजता ते दोघेही माघारी परतले.

मात्र सायंकाळी उशीर झाल्याने बाळकृष्ण याने आपल्या भावोजीना फोन करून कळवले की, आपली एक मैत्रीण आली आहे. तिला तुमच्याजवळ घेऊन येऊ का ? तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर बाळकृष्ण कामाला होता त्या मालकांना फोन केला . त्यांना विचारले की तुमच्याजवळ रूम मिळेल का ? आपली एक मैत्रीण आली आहे. त्यांनीही नकार दिला, मात्र आपल्या हॉटेलची एक केबिन रिकामी असून तिथे शक्य होत असेल तर राहा. त्यानुसार त्या ठिकाणी त्या युवतीची व्यवस्था करण्यात आली.

पुढे दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण आणि फिर्यादी पीडित युवती दोघे बाळकृष्णच्या बहिणीकडे गेले. व बहिणीला व भावोजीना लग्न करायचे असल्याची कल्पना दिली. यावेळी बहिणीने सांगितले की, सध्या तेवढे पैसे नाही आहेत. आपण थोडा विचार करून लग्न करू. त्यानंतर ती दोघे माघारी परतली व पुन्हा तरेळे बसस्थानक येथे आली. त्यानंतर त्या युवतीला बाळकृष्ण एका चायनीज सेंटर मध्ये बसवून निघून गेला. त्यानंतर बराच वेळ तो परत आला नाही, म्हणून त्या पिढीत युवतीने शोधाशोध केली. यावेळी त्याला फोन देखील त्या युवतीने केला. तर फोनवर आपण एका दुकानामध्ये दारू पित आहे.असे सांगितले. त्यानंतर ती युवती बाळकृष्णने सांगितलेल्या शॉपपर्यंत पोहोचली. त्यावेळी बाळकृष्ण हा दारू पीत होता. तिने त्याला त्या शॉप मधून बाहेर आणलं.

पुन्हा एकदा बाळकृष्ण याने त्या युवतीला सांगितले की, आपण कासार्डेला जाऊ मी थोड्याच वेळात आलो. तिला बाळकृष्ण हा स्टॅण्डवर बसून निघून गेला. त्यानंतर तो रात्री ७:४५ वाजता रिक्षा घेऊन तळेरे येथे बस स्थानकावर आला.

मात्र ज्या रिक्षावाल्याला बाळकृष्ण घेऊन आला त्या रिक्षावाल्याला पीडित मुलगी ओळखत होती. बाळकृष्णाने तिला रिक्षात बसवल्यावर घरी जाऊ असे सांगितले व पुढे निघालेले असताना एका शॉपीसमोर रिक्षा थांबवली. त्यानंतर तो एका वाईन शॉपीमध्ये जाऊन वाइन घेऊन परत आला. जाता जाता रिक्षामध्ये तिला जबरदस्तीने वाईन प्यायला लावली. रिक्षावाल्याने नाद येथे सोडतो असे सांगितले व तो रिक्षा घेऊन थेट दारूमच्या दिशेने निघाला होता. रिक्षा दारूम – बौद्धवाडी येथे गेल्यावर थांबवली. त्या ठिकाणी पुन्हा एक रिक्षावाला शैलेश तांबे आला. तो त्या मुलीच्या बाजूला रिक्षात बसला. ती मुलगी बाळकृष्ण याला बाळू असे म्हणत होती. त्यामुळे तिने बाळूला विचारले की, हा माझ्या शेजारी का बसला आहे. तेव्हा बाळू काहीही बोलला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने पुढे गेल्यावर दारूमच्या रिक्षावाल्याने विचारले की तू बाळकृष्णची माणूस आहेस ना ? यावेळी ती युवती धुंदीत असल्याने तिला काही समजले नाही.

पुन्हा एकाच रिक्षातून ते तिन्ही युवक त्या पीडित युवतीला घेऊन दारूम माळरानावर गेले. दरम्यान, बाळूकडून त्या युवतीला सकारात्मक रिस्पॉन्स मिळत नव्हता. यावेळी ती वाईन प्याल्यामुळे पूर्णपणे गुंगीत होती. त्यामुळे नेमका प्रकार काय घडत आहे, हे तिच्या लक्षात येत नव्हते. मात्र ज्यावेळी आपल्यावर जबरदस्ती होत आहे हे तिच्या लक्षात आल्यावर बाळू कुठे गेला असे त्यांना तिने विचारले. बाळू बाजूला दारू प्यायला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.

मात्र बाळू त्यावेळी रिक्षातच बसला होता. पुन्हा ती युवती बाळू सोबत बोलली आणि पुन्हा गुंगी आल्यावर ती रिक्षात झोपली. तिच्यावर जबरदस्ती केली गेली. तेव्हा देखील बाळू रिक्षात बसला होता. या सर्व प्रकारानंतर मुलीची चौकशी करण्यासाठी तिच्या वडिलांचा तिला फोन आला. त्यानंतर ४:३० वाजता ते तीन युवक व ती युवती तिथून घराच्या दिशेने जायच्या विचाराने निघाले. यावेळी दारूमच्या रिक्षावाल्याने व शिरवलीच्या रिक्षावाल्याने तिला आता घडलेला प्रकार
कोणालाही सांगायचे नाही, अशी धमकी दिली.

मात्र तिला दोन दिवसानंतर काहीसा त्रास जाणवू लागल्याने तिने बाळकृष्ण याच्याकडे त्या दोन युवकांची नावे विचारली. तसेच घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना दारूमच्या माळरानावर १५ ते १६ ऑक्टोबरच्या पहाटे ५:३० वा. च्या सुमारास घडली.

या प्रकरणाची माहिती घेऊन कणकवली पोलिसांनी गुरुवारी रात्रीच त्या आरोपींना अटक केले. त्यानंतर कणकवली पोलिस ठाण्यात विचारपूस करून त्यांच्यावर ३७६ ( ड ), ३५४ ( अ १ i ) ३२८ व ( अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध ) कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.