न्यूझिलंड विरोधात भारताचा ‘ रोमहर्षक ‘ विजय

तब्बल २० वर्षांनंतर विश्वचषकात न्यूझिलंडवर मात
धरमशाला : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझिलंड विरोधातील सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या ९५ धावांच्या जोरावर रोमहर्षक विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मा ( ४६ ) बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने एका बाजूने पडझड होत असताना भारताचा डाव सावरला. त्यानंतर के एल राहूल व रविंद्र जडेजा सोबत महत्वपूर्ण भागिदारी करीत विजयी लक्ष पार केले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला ५० षटकांत सर्वबाद २७३ धावांवर रोखले होते. न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेल १३० ( १२७ ) व रचिन रविंद्र ७५ ( ८७) धावांची खेळी केली. भारतीय संघातर्फे गोलंदाजी करताना या विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या मोहम्मद शमीने ५ गडी बाद करीत न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
त्यानंतर भारतीय फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच आक्रमक पवित्रा घेत ४० चेंडूत ४६ धावा केल्या. त्याला शुभमन गिलने ३१ चेंडूत २६ धावा करीत चांगली साथ दिली. त्यानंतर एका बाजूने कोहली किल्ला लढवत असताना श्रेयस अय्यर २९ चेंडूत ३३ धावा व ३५ चेंडूत २७ धावा यांनी चांगली साथ दिली. त्यानंतर मात्र सुर्यकुमार २ धावांवर धावबाद झाल्यानंतर विजयी लक्ष कठीण वाटत असताना रविंद्र जडेजाने ४४ चेंडूत ३९ धावा करीत विराट कोहलीसह विजयी लक्ष गाठले. षटकार खेचून वैयक्तिक शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कोहली ९५ धावांवर बाद झाल्यानंतर विजयी चौकार खेचत जडेजाने विजय मिळवून दिला व भारताने जल्लोष साजरा केला.
या विजयाने भारतीय संघाने २००३ नंतर प्रथमच विश्वचषकात न्यूझीलंडचा पराभव केला. विराट कोहलीचे ४९ वे शतक मात्र हुकले. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग पाचवा विजय प्राप्त करीत गुण तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. आता रविवार २९ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा सामना गतविजेत्या इंग्लंड संघासोबत होणार आहे.