श्री शिवप्रतिष्ठान-हिंदुस्तान फोंडाघाट ची “दुर्गामाता दौड” खऱ्या अर्थाने सीमोल्लघन ठरावे. — मंगेश पाटील.

स्वराज्याचे सुराज्य होण्यास ही दौड प्रेरणादायी — अक्षय धुरी

फोंडाघाट बाजारपेठ शिवछत्रपतींच्या जयजयकाराने आणि मंत्रोच्चार व श्लोकांनी दणाणली !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय |
श्री संभाजी महाराज की जय |.
भारत माता की जय |
हिंदूधर्म की जय |.
च्या घोषणांनी फोंडाघाट बाजारपेठेची सकाळ शिवमावळ्यांनी दणाणून सोडली. निमित्त होते विजयादशमीच्या प्रभाती दुर्गामाता दौडीचे,अन् आयोजक होते ‘श्री शिवप्रतिष्ठान – हिंदुस्तान ‘- सिंधुदुर्ग, आणि फोंडाघाट- कुळाचीवाडी मधील शिवशंभो सामाजिक कला-क्रीडा मंडळाचे अबालवृद्ध, पुरुष- महिला शिवप्रेमी !

आज भारत देशावर अनेक संकटे आहेत.आपण शिवजयंती साजरी करतो.परंतु शिवरायांचे अपूर्ण स्वप्न,म्हणजेच स्वराज्याचे सुराज्यामध्ये परिवर्तन करणे. परंतु त्यापर्यंत आपण न पोहोचता, छत्रपतींना समजून न घेता, उत्सव साजरे करतो. याकरिता शिवबांचे स्वप्न जनमानसात रुजवावे, आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी, परकीय आक्रमणे परतून लावण्यासाठी आपल्या पारंपारिक शस्त्रांची ओळख व्हावी आणि छत्रपतींची कुलदेवता श्री तुळजाभवानी प्रती श्रद्धाभाव अर्पण करावा, यासाठी संस्थेच्या माध्यमातून ‘दुर्गामाता दौड’ संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केली जाते.त्यामुळे या संस्कारातून समाज बदलला तर त्याचे रूपांतर सुराज्यामध्ये होण्यास विलंब लागणार नाही. असे मार्गदर्शक उद्गार संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी काढले.

निश्चयाचा महामेरू |
बहुत जनांची आधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी |
अशा शब्दात शिवरायांचे वर्णन करताना,अक्षय धुरी यांनी देवीची गेली नऊ दिवस उपासना करताना प्रेरणा मंत्र म्हणून अन शिवरायांचा जयजयकार करून स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी फोंडाघाट सिंधुदुर्गात ही दुर्गा माता दौड नक्कीच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

राम प्रहरी सर्व मावळे महिला- पुरुष पेठेतील राधाकृष्ण मंदिरात एकत्र जमले. शिवबाचा पवित्र भगवा ध्वजाचे पूजन प्रेरणा मंत्रोच्चारात करण्यात आले. शेजारी प्रतिकात्मक तलवारीचे पूजन करण्यात आले.
देव मस्तकी धरावा |
अवघा हलकल्लोळ करावा |.
मुलुख बडवावा की बुडवावा |
धर्म स्थापनेसाठी |
हर हर महादेव |
राजा शिवछत्रपती की जय |आणि अन्य जयजयकारांनी फोंडा बाजारपेठ दुमदुमली. भगवा ध्वज धारकरी आणि तलवार धारी युवती यांच्या पाठोपाठ शिस्तबद्ध पद्धतीने सर्वजण दौड मध्ये सामील झाले. ही दौड राधाकृष्ण मंदिर- बाजारपेठ -मारुती वाडी मार्गे कुळाची वाडी येथे शिवस्मारका ठिकाणी संपन्न झाली.वाटेत मावळा निखिल तेली यांनी केलेले तलवारबाजी आणि दानपट्टा यांचे प्रात्यक्षिक सर्वांनाच भारावून गेले.त्यामुळे पारंपारिक शस्त्रांची माहिती उपस्थिताना झाली.यावेळी सर्वांनी दुर्गा माता दौडीचे श्लोक, खड्या आवाजात म्हणून तुळजाभवानीचे स्तवन केले.

या दौडीमध्ये सपना तांबे,स्मिता धुरी, पूर्वा गाड, दिशा कदम, अमित चव्हाण, रवींद्र धुरी, अशोक लाड, दत्तगुरु गुरव,गणेश लाड ,गुरुनाथ मेस्त्री,प्रवीण कातरुड, अरुण झोरे, अप्पा लाड यासह वाडीवरील जेष्ठ ग्रामस्थ महिला- पुरुष, युवा- युवती आणि शिवशंभो सामाजिक कला – क्रीडा मंडळाचे मावळे सहभागी झाले होते. या दुर्गामाता दौडीचे, वाटेमध्ये अनेक ठिकाणी औक्षण करून, ध्वजाला मानवंदना देताना छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. दुर्गामाता दौडीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संस्थेला भावी कार्यात ग्रामस्थांनी शुभेच्छा देताना, असे उपक्रम नेहमी या ठिकाणी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली…