बंदर विभागाच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करणार…

मालवण येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी दिला गंभीर इशारा 

मालवण | प्रतिनिधी : मालवण बंदर जेटी येथे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझे बांधकाम हटविताना इतरही शासकीय जागेतील व अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने समुद्राखालील उपोषणाचा निर्णय कायम आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बंदर विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात ठोस कार्यवाही न झाल्यास बंदर विभागाच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करणार असल्याचा इशारा पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी दिला आहे.

येत्या काही दिवसात शासकीय जागेतील तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली नाही तर आपण अधिक आक्रमपणे प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचेही तोडणकर यांनी स्पष्ट केले.

दामोदर तोडणकर यांनी पत्रकार परिषद माध्यमातून भूमिका मांडली. यावेळी त्यांची पत्नी दिव्या तोडणकर, मुलगा ओम तोडणकर उपस्थित होते. बंदर विभागाने सुडभावनेतून माझे राहेत घर तोडलेले आहे. यामुळे आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहे. न्यायप्रविष्ठ बाब असताना जेसीबीच्या सहाय्याने माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तसेच बंदर विभागातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी केलेले अनधिकृत बांधकाम अद्याप पाडण्यात आलेले नाही, आपल्या कुटुंबियांना वाचवून इतरांचे बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अधिकाऱ्या बाबत आपण शासनाचे लक्ष वेधणार आहे, असेही तोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय जागेमध्ये उभारण्यात आलेल्या बांधकामांची यादी प्रशासनाने तयार केलेली आहे. यामुळे या बांधकामांवर कारवाई करण्याची धमक प्रशासनाने दाखविली पाहिजे. माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या पद्धतीने तातडीने कार्यवाही करण्यात आलेली होती, त्याप्रमाणे इतरांचेही बांधकाम तोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा आपण उपोषण करणार आहोत.

मी मच्छीमार आणि गाबित कुटुंबातील असतानाही माझे बांधकाम तोडण्यात येत असताना माझ्या पाठिशी कोणीही उभे राहिले नाही, मला एकटा पाडण्यात आलेले होते. यामुळे आता मी माझी लढाई लढणार आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईप्रमाणेच इतरांचीही बांधकामे हटविण्यात येणे आवश्यक आहे. तरच शासन यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असल्याचे दिसून येईल, अन्यथा फक्त माझ्यासाठीच कारवाई होती काय? असा सवाल निर्माण होत आहे, असेही तोडणकर म्हणाले. तसेच बंदर जेटी परिसरातील झाडे जमीनदोस्त करण्याचे आदेश देणाऱ्या व झाडे जमीनदोस्त करणाऱ्या विरोधात आपण तक्रार करणार असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले.