मडूरेत २ कोटींचा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा होणार

लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

बांदा (प्रतिनिधी) :
मडुरा – सातोसे सीमेवरील नदीपात्रात लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे दोन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी पद्धतीचा सिमेंट बंधारा होणार आहे. लपाचे उपविभागीय जल संधारण अधिकारी आर. टी. धोत्रे यांनी नुकतीच बंधारा स्थळाची पाहणी केली. त्यांनी राज्य शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. सदर बंधारा अस्तित्वास आल्यास मडुरा, कास गावांसह सातोसे  गावांचा पाणीटंचाई प्रश्न संपुष्टात येणार आहे.
मडुरा नदीवर  लघुपाटबंधारे विभागाचा सुमारे ७० वर्षांपूर्वीचा बंधारा पूर्णपणे जीर्ण झाला आहे. बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी लीकेज होत असल्याने नळपाणी पुरवठ्यासह नगदी शेतीवरही विपरीत परिणाम होत आहे. त्याठिकाणी पुन्हा नव्याने बंधारा उभारण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी उपसरपंच बाळू गावडे यांनी कंबर कसली आहे. पाणीवापर संस्था स्थापन करण्यासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.
उपविभागीय अधिकारी धोत्रे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य ते मार्गदर्शन केले. सुमारे ४० मीटर लांब व पाणीपातळी पासून अडीज मीटर उंचीचा बंधारा असणार आहे. पाणी निचरा होण्यासाठी ६ कृत्रिम झडपे राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, सामाजिक कार्यकर्ते बाबली परब, जल संधारण अधिकारी टी. पी. यादव उपस्थित होते.
सदर बंधाऱ्याचे काम झाल्यास मडूरा, कास गावासह सतोसे गावाचाही पाणी प्रश्न संपुष्टात येणार आहे. शिवाय उन्हाळ्यात मिरची, चवळी, नाचणी यासारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेणे शक्य होईल. शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल असे उपसरपंच बाळू गावडे यांनी स्पष्ट केले.