कणकवली : महात्मा गांधीजी यांच्या आदेशाने १९४५ साली आप्पासाहेब पटवर्धन गोपुरी आश्रमात आले. त्यानंतर गोपुरी आश्रमचे नंदनवन झाले. आप्पासाहेब पटवर्धन यांनी सामाजिक क्षेत्राबरोबर सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्यामुळेच गोपुरी आश्रमची ख्याती सर्व दूर पसरली आहे. येत्या काळात गोपुरी आश्रमच्या माध्यमातून कोकणात बांबू लागवड करून कागद कारखाना करण्यासाठी प्रयत्न करूया. यातून हजारो लोकांना रोजगार मिळेल. हीच खरी आप्पासाहेब पटवर्धन यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक दादा कुडतरकर यांनी केले. गोपुरी आश्रम वागदे आणि नाशबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गोपुरी आश्रमच्या सभागृहात कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांची १२९ वी जयंती साजरी करणात आली.
यावेळी गोपुरी आश्रमचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, जेष्ठ नागरिक दादा कुडतडकर, अशोक करंबेळकर, इर्शाद शेख, मोहन सावंत, महेश सरनाईक, डॉ. लिंगावत, विजय सावंत, अर्पिता मुंबरकर, प्रमोद लिमये, स्मिता नलावडे, ऍड. मनीषा पाटील, बाळू मेस्त्री यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अशोक करंबेळकर म्हणाले, कोकणातून अनेक थोर व्यक्तिमत्व निर्माण झाले. आपण त्यांचे साजरे करतो मात्र त्यांना जे अपेक्षित कार्य होते ते आपण त्यांच्या जिल्ह्यातील त्यांच्या भागातील कोकणातील नागरिक म्हणून अमलात आणतो का? जोपर्यंत आपण कृतीने त्यांना आदरांजली वाहने गरजेचे आहे. आताच्या तरुण पिढीचे विचार व आप्पासाहेब पटवर्धन यांचे विचारांमध्ये काहीशी विसंगती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा स्थानिक लोक जगावे शहरांपेक्षा गावांचा विकास व्हावा या गांधीजींच्या तत्त्वानुसार त्यांचे कार्यकर्ते काम करत होते आताच तरुण पिढी गाव सोडून शहराच्या ठिकाणी कामानिमित्त जात आहेत. त्यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. आता तरुण पिढीने त्या थोर व्यक्तींचे विचार आत्मसात करून खेड्यांचा विकास करावा, असे मत श्री. करंबेळकर यांनी मांडले.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, सध्याच्या तरुण पिढीमध्ये विघातक मानसिकता निर्माण झाली आहे. माणसातला माणूस हरवून हैवान होत आहेत. त्यामुळे आप्पासाहेब पटवर्धन व गांधीजींचे विचार तळागाळात पोहोचवण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. महेश सरनाईक, ऍड. मनीषा पाटील, डॉ. लिंगावत, इर्शाद शेख आदींनी मनोगत व्यक्त करून आप्पासाहेब पटवर्धन यांना आदरांजली दिली.
कार्यक्रमादरम्यान नशाबंदी मंडळात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोगले व श्रेयस शिंदे यांनी केले तर आभार बाळू मेस्त्री यांनी मानले.












