सावंतवाडी । प्रतिनिधी : भात कापणीचा आणि हंगाम सुरू असताना सोमवारी सायंकाळी अचानकपणे झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापून वाळत घातलेल्या भाताच्या लोंब्या भिजून गेल्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यात अचानकपणे ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. ताडपत्र्या, प्लास्टीकच्या सहाय्याने गवत व भाताच्या उडव्या झाकण्याचा शेतकर्यांनी प्रयत्न केला. मात्र, अचानकपणे आलेल्या पावसामुळे नुकसान टाळता आले नाही.
भात कापण्याचा ऐन हंगाम सुरू आहे. त्यातच दिवाळी तोंडावर आल्याने कापलेले भात मळणी करून वाळवण्याचे काम ही सुरु आहे.
शेतकऱ्यांची ही लगबग सुरू असतानाच सोमवारी दुपारनंतर अचानक पणे परतीचा पाऊस कोसळला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापून ठेवलेली भात शेती पाऊस झाल्याने कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








