सावंतवाडी । सचिन रेडकर : बांदा येथील रावसाहेब गोगटे – वाळके महाविद्यालयाचे हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शरद बाबणी शिरोडकर यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘शैलेश माटियानी और राजन गवस के कथा साहित्य का तुलनात्मक अध्ययन ‘ या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनास शोध निर्देशक म्हणून डॉ. विद्या शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शरद शिरोडकर हे सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचे सुपुत्र असून गावात पीएचडी ( डॉक्टरेट ) पदवी प्राप्त करण्याचा पहिला मान त्यांनी मिळवला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा. शरद शिरोडकर यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधात हिंदी साहित्यातील उत्तराखंड आल्मेडा येथील सुप्रसिद्ध साहित्यीक शैलेश माटियानी यांचे कथा साहित्य व मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यीक राजन गवस यांच्या कथा साहित्यावरील तुलनात्मक अध्ययन या विषयावर प्रबंध सादर केला होता.
शैलेश माटियानी आधुनिक हिन्दी साहित्य विश्वातील प्रसिद्ध साहित्यीक होते. त्यांच्या ‘बोरीवली से बोरीबन्दर’ तसेच ‘मुठभेड़’, अशा कादंबऱ्या तर चील, अर्धांगिनी अशा कथा सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच ‘बोरीवली से बोरीबन्दर ‘ या कादंबरीवर प्रा. शिरोडकर यांनी प्रबंध सादर केला आहे. या कादंबरीत मुंबईतील फुटपाथचं जीवन तसेच शोषित, पीडीत समाजाच्या तसेच कामाठीपूरा सारख्या वस्तीतील जीवन प्रवास मांडण्यात आला आहे.
तर डॉ. राजन गवस हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावातील असून ते मराठीतील नामवंत लेखक आहेत.कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य असे साहित्य त्यांनी लिहीले आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. याच दोन्ही लेखकांच्या कथा साहित्यवरील तुलनात्मक अभ्यास ( अध्ययन ) या विषयावर प्रा. शिरोडकर यांचा प्रबंध आहे.
अत्यंत बिकट परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या शरद शिरोडकर यांनी मळगांव हायस्कूलमधून एस एसएसी चे शिक्षण पूर्ण केले. एक वेळ अशी होती की फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहणार होते. मात्र मला खूप शिकायचेय या जिद्दी पोटी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. खर तर खेळात असल्याने हा मुलगा शिक्षण पूर्ण करणार नाही असाच त्यावेळी सर्वांचा कयास होता. आपला मुलगा सर्वात जास्त शिकावा ही त्यांच्या आईची इच्छा होती व तीच त्यांची प्रथम प्रेरणास्थान होती.
एसएससी नंतर त्यांनी आय टी आय मधून डिझेल मेकॅनिक हा कोर्स पूर्ण केला. मात्र त्यानंतर पुन्हा कॉलेज जीवनाकडे येऊन त्यांनी एसपीके कॉलेज मधून बिएची पदवी प्राप्त केली. यावेळी त्यांना प्रा. डॉ. जी ए बुवा यांचे चांगले मार्गदर्शन लाभले. पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम ए व पुणे विद्यापीठातून एम पी एड पूर्ण केले.
खर तर या त्यांच्या यशानंतर त्यांना मुंबई पुणे सारख्या शहरात मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळत होती. मात्र, आपल्या शिक्षणाचा फायदा येथील मुलांना होऊन त्यातून चांगले खेळाडू तयार होतील असा विचार करून त्यांनी आपल्या जिल्ह्यातच नोकरी करण्याचे ठरवले.
सुरुवातीला १९९५ साली कणकवली कॉलेजमध्ये क्रीडा संचालक तर त्यानंतर संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे २ वर्षे व फोंडाघाट महाविद्यालयात १ वर्ष क्रिडा संचालक म्हणून काम केले. त्यानंतर ते बांदा येथील रावसाहेब गोगटे – वाळके महाविद्यालयात रुजू झाले. याच दरम्यान त्यांनी मदुराई कामराज युनिव्हर्सीटीतून एम फील मिळविली.
गोगटे वाळके कॉलेजचे म्हणजेच शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संस्थेचे प्रेसिडंट तथा जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार कै. डॉ. बी.बी. गायतोंडे यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्याच प्रेरणेतून त्यांनी पीएचडी मिळवायचा निश्चय केला. यात त्यांना माजी चेअरमन उमेश फातरफोड, विद्यमान अध्यक्ष डी. बी. वारंग, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, टी. एन. शेटकर, एस आर सावंत, कै. सुभाष मोर्ये, सतीश येडवे, पणशीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कॉलेज जीवनात डॉ. जी.ए. बुवा, तसेच मळगांव येथील प्रसिद्ध साहित्यीक ‘गाठोडं ‘ कार कै. उदय रमाकांत खानोलकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रा. डॉ. प्रवीण बांदेकर, राजन गवस यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचेही मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन त्यांना नेहमीच लाभले.
शरद शिरोडकर यांना लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती. उत्कृष्ट खो खो, कबड्डी पटू म्हणून ते ओळखले जायचे. टेनिस बॉल व लेदर बॉल क्रिकेटचे ही ते अष्टपैलू खेळाडू म्हणून ते जिल्हाभरात नावाजले होते. आजही वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत ते मैदान गाजवत आहेत. त्यांना उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ॲम्युचल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे त्यांनी कबड्डीचे राष्ट्रीय पंच म्हणून देखील काम केले आहे.












