स्वतःची चिता रचत ७० वर्षीय वृध्दाने केली आत्महत्या

लांजा तालुक्यात कुठे घडली ही भयानक घटना पहा

 लांजा (प्रतिनिधी) घराशेजारी असलेल्या पडवीत लाकडे आणि जुने वासे यांची चिता तयार करून त्यात स्वतः आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पालू पांदले खालची वाडी येथे बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्यच्या सुमारास घडली आहे .या घटनेने गावात खळबळ उडाली असली तरी मानसिक संतुलन बिघडण्याच्या कारणातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची खबर सुबोध बाबुराव गाडे (राहणार पालू, पोलीस पाटील) यांनी लांजा पोलिसांना दिली आहे .पालू पांदले खालचीवाडी येथील शंकर सखाराम सपकाळ (वय ७०) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. वयोवृद्ध झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच अवस्थेत आज आठ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या बाजूला असलेल्या पडवीत ठेवलेली लाकडे तसेच जुने वासी यांची चिता पेटवून त्यात आत्महत्या केल्याने पूर्ण शरीर जळून भस्मसात झाले.

या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी जाऊन भेट दिली. याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव हे करत आहेत. लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.