लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित तालुकास्तरीय लेख स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न

लांजा (प्रतिनिधी) लोकमान्य वाचनालयातर्फे खास महिलांसाठी आयोजित तालुकास्तरीय लेख स्पर्धेत सौ. क्रांती केसरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हा बक्षीस वितरण वाचनालयात संपन्न झाला

लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेच्या वतीने नवरात्रौत्सव व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी नऊ कर्तृत्ववान महिलांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘मला भावलेले आत्मचरित्र’ ही तालुकास्तरीय मर्यादित लेख स्पर्धा खुल्या, गटामध्ये आयोजित करण्यात आली होती.सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम वाचनालयात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य वाचनालयाच्या संचालिका सौ.विजयालक्ष्मी देवगोजी होत्या. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे, उपाध्यक्ष योगेश वाघ़धरे, कार्यवाह उमेश केसरकर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, संचालिका सौ ललिता भिंगे आदी मान्यवर उपस्थित होते
सर्वप्रथम माता सरस्वती आणि साहित्यिक कवी पु. ल. देशपांडे यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे लेख स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर लेख स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक सौ.क्रांती केसरकर, द्वितीय क्रमांक तनुजा प्रभूदेसाई आणि तृतीय क्रमांक सौ. चेतना धोंडये, यांना तसेच उत्तेजनार्थ क्रमांक सौ. अनुजा कांबळे आणि ऐश्वर्या शिंदे यांना रोख रक्कम, पुस्तक व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं . शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाचे शिक्षिका सौ. वर्षा तेंडुलकर आणि सौ. योजना वाघदरे यांनी केले.

लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांनी वाचन आणि वाचनाचे महत्त्व तसेच लोकमान्य वाचनालय दरवर्षी घेत असलेल्या नवनवीन उपक्रमाची माहिती दिली .त्यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी या पुस्तकाचे अभिवाचन करून पु.लं. देशपांडे यांच्या विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक वाचनालयाच्या संचालिका सौ.ललिता भिंगे यांनी केले तर आभार वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी मानले. या कार्यक्रमास वाचनालयाचे वाचक, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.