परंपरा ४६ वर्षाची, आगळ्या वेगळ्या छंदाची!

दीपक भोगटे यांचा कंदील ठरतोय आकर्षण

मसुरे | झुंजार पेडणेकर : कट्टा गावचे सुपुत्र आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी ४६ वर्षाची परंपरा जपत या दिवाळीत सुद्धा वेगळे पण जपणारा दिवाळी कंदील बनवला आहे. १९७७ साली त्यांनी पहिला कंदील केला होता. तत्कालीन राजकीय परिस्थिती नुसार नांगरधारी शेतकरी चिन्ह असलेला तो कंदील होता. गेली ४६ वर्ष दीपक भोगटे दिवाळीला इको फ्रेंडली कंदील करतात.कोजागरी पौर्णिमा झाली की कंदील करायच्या कामास ते प्रारंभ करतात. एखादा वर्तमान विषय घेऊन ते कंदील बनवतात. यंदाचे वर्ष नानांचे म्हणजे प्रा. मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि त्यांचा स्मृतिदिन सुद्धा आज १२ नोव्हेंबर लस्मीपूजना दिवशीच आहे. त्याना अभिवादन म्हणून यंदाचा दिवाळी कंदील त्यांनी बनविला आहे. विशेष म्हणजे ४६ वर्षापूर्वीचा नांगरधारी शेतकरी सुद्धा या कंदीलावर आहे. दीपक भोगटे यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाचे कौतुक होत आहे.