लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) अमावस्येच्या दिवशी केले जाते. ती अमावस्या संध्याकाळी असली पाहिजे. यंदा १२ तारखेला दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी चतुर्दशी संपत आहे आणि संध्याकाळी अमावस्या आहे. त्यामुळे या वर्षी लक्ष्मीपूजन १२ तारखेला होईल. सूर्योदयाला असलेली अमावस्या १३ तारखेला आहे; पण संध्याकाळी असलेली अमावस्या १२ तारखेला आहे. त्यामुळे रविवारी, १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होईल. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला सहा वाजल्यापासून रात्री ८.५० पर्यंत पूजा करता येईल. काही जणांना यामध्ये पूजा करण्यास जमले नाही, तर ते दुपारी २ ते ३ किंवा रात्री ९ ते ११ या वेळेतही पूजा करू शकतात. व्यवहारात वापरला जाणारा पैसा-अडका, प्रत्यक्ष लक्ष्मी देवतेचे पूजन (Lakshmi Puja) आणि त्याबरोबर कुबेरपूजन करायचे आहे. लाह्या, साळीच्या लाह्या, बत्तासे, धने, मिरे अशा वृद्धी करणाऱ्या पदार्थांचा वापर या पूजेमध्ये करायचा असतो. या गोष्टी शरद ऋतूमध्ये आरोग्यासाठी पोषक असतात, म्हणून या गोष्टी पूजेत वापरल्या जातात. केवळ दिवाळीचा हा एवढाच दिवस आपण अमावस्येच्या (Amavasya) दिवशी लक्ष्मीचे पूजन (Lakshmipujan) करतो.
बलिप्रतिपदेला वहीपूजन कधी करावे?
यंदा लक्ष्मीपूजनानंतर लगेचच दिवाळीचा पाडवा आलेला नाही. १४ तारखेला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदेचा दिवस आपण साजरा करतो. यालाच दिवाळीचा पाडवा असेही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, असा महत्त्वाचा दिवस मानला आहे. आपल्याकडे नवीन वर्ष सुरू होते, त्याला ऐतिहासिक, पौराणिक कथेचे संदर्भ असतात. शालिवाहन शकातील चैत्र शुद्ध प्रतिपदेलासुद्धा शुभ मुहूर्त मानले जाते; तसेच विक्रम संवत्सरातील हा आरंभाचा दिवस असल्यामुळे याला शुभ दिवस मानलेला आहे. गुजरात, मारवाड येथील व्यापारी वर्ग या दिवशी मोठ्या प्रमाणावर वहीपूजन करत असतो. या वर्षी १४ नोव्हेंबरला, मंगळवारी पहाटे अडीच ते साडेपाच या वेळात किंवा सकाळी पावणेसात ते साडेसात या वेळेत दुकानातील वहीपूजन करायचे आहे. अकरा ते एक वाजेपर्यंत केले तरी चालेल. दुकानातील हिशेब लिहिण्याच्या वहीचे हे पूजन केले जाते.
नातेसंबंधांची दिवाळी
Significance of Diwali : गायी-गुरांशी असलेली नाती, व्यापाऱ्यांशी असलेली नाती, आरोग्याचे नाते या दिवाळीनिमित्ताने सांभाळले जाते; तसेच पाडवा हा पत्नीने पतीला ओवाळण्याचा दिवस. दोघांमधील नाते वृद्धिंगत व्हावे आणि ते जपले जावे, असा हा सण. दुसरा दिवस भाऊबीजेचा (Bhaubij) आहे. बहिणीने भावाला ओवाळण्याचा हा दिवस. सोवळ्या-ओवळ्याशिवाय केला जाणारा हा दिवाळीचा सण आहे. गणेशोत्सव, नवरात्र यात सोवळे असते, नैवेद्याचे प्रकार असतात; पण दिवाळी सगळ्यांना सामावून घेणारा सण आहे. त्यामुळे यात सगळे जण मोकळेपणाने सहभागी होऊ शकतात.
तुलसी विवाह कधी करता येतील? (Tulsi Vivah Date and Time)
प्रबोधिनी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे. विष्णूप्रबोधन एकादशी आहे. आषाढी एकादशीला भगवान विष्णूंचा शयनकाळ सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला हा काळ संपतो. त्यामुळे साधारणपणे चातुर्मासात विवाह मुहूर्त होतात. विष्णूंचा हा प्रबोधोत्सव झाला, की त्याचे लग्न आपण दुसऱ्या दिवशी तुळशीशी लावून देतो. पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करता येतो. ही तुलसी विवाह समाप्तीची पौर्णिमा २७ नोव्हेंबरला आहे. मात्र, मंदिरांमध्ये दिवे लावून साजरी होणारी त्रिपुरारी पौर्णिमा २६ तारखेला साजरी केली जाणार आहे. आपल्याकडे सगळ्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिवे लावून हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह यात विवाह शब्दप्रयोग असला, तरी हा एक पूजेचा विधी आहे. अलीकडे तो मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोसायट्यांमध्ये एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर तुलसीविवाह साजरे केले जातात. यानिमित्ताने सामाजिक एकोपा आणि नातेसंबंध आपण वृद्धिंगत करत असतो.











