शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कुडाळ मध्ये धक्का…

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय भोगटे यांनी केली पक्ष सोडण्याची घोषणा.

लवकरच पक्ष सोडण्याची कारणे लवकरच जाहीर करणार- संजय भोगटे

कुडाळ | प्रतिनिधी

उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष  सोडत असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य व तालुका प्रवक्ते संजय भोगटे यांनी पत्रकार परिषदेत देत, मी पक्ष स्वच्छेने सोडत नसुन पक्ष सोडण्याची कारणे लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापने नंतर अगदी दहाव्या मिनिटांमध्ये मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या पैकी मी एक आणि त्यानंतर मी राष्ट्रवादीचे काम कुडाळ तालुका, शहरामध्ये सुरू केले.  तालुक्यामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं हे नवीन सांगण्याची गरज नाही. त्यावेळी पहिलीच  निवडणूक सावंतवाडी अर्बन बँकेचे लढवली. त्यावेळी तिरंगी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षात होती. त्यामध्ये विजय झाला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या  राष्ट्रवादी व शिवसेनेच्या माध्यमातून लढवली व विजयी झालो. चांगल्या प्रकारे काम केले.

काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक, कार्य असो सांस्कृतिक काम असो की राजकीय काम असो मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नऊ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या उपस्थितीत सध्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नऊ वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करत होतो. पक्षाचे काम कशा पद्धतीने काम केलं हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. आता मात्र  मी या पक्षाचा, जिल्हा कार्यकारी सदस्य व तालुका प्रवक्ते पदाचा राजीनामा देवुन त्या संघटनेतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तसेच कोणत्या पक्षात जाणार ते अजुन जाहीर करणार नसुन राजकीय काम मात्र करीतच राहणार असे सांगितले.

जनतेच्या कामासाठी मंत्र्याना भेटतो- संजय भोगटे

मी लोकांच्या कामासाठी मंत्री दिपक केसरकर तसेच इतर मंत्र्यांना भेटतो, त्यावेळी मी दुसर्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, पण येथील स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी गटात असतानाही ते सर्व मंत्र्यांना भेटतात त्याचे काय? असा नाव न घेता आमदार वैभव नाईक यांना टोला भोगटे यांनी लगावला.