खेड तालुका लाकूड व्यापाऱ्यांच्या निशाण्यावर ?

कमी कष्टात जास्त कमाईचे स्वप्न; चिपळूणनंतर खेड तालुक्यात कारवाई कधी होणार?

खेड(प्रतिनिधी) कमी कष्टात जास्त कमाई करण्याची स्वप्ने उराशी बाळगलेल्या लाकूड व्यापाऱ्यांनी खेड तालुका आपल्या निशाण्यावर ठेवल्याचे विदारक सत्य समोर येत आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील जंगले सध्या बोडकी झाल्याचे निदर्शनाला येत आहे.

खेड तालुका भौगोलिक दृष्टीने दुर्गम भागात पसरलेला आहे. अनेक गावे डोंगर भागात वसलेली आहेत. शेती हेच उपजीविकेचे साधन असलेल्या खेड्यातून इथले झटपट पैसे कमावण्यासाठी लाकूड व्यापारी शेतकऱ्यांना पैसे कमविण्याचे आमिष दाखवून त्यांची जंगले विकत घेत आहेत. खेड तालुक्यातच लोटे परशुराम ही सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. इथल्या बहुतांश उद्योजकांना उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या बॉयलरला पारंपरिक इंधनापेक्षा लाकूड वाजवी दरात उपलब्ध होत असल्याने ‘किटा’ या
नावाने हे लाकूड व्यापारी लाकूड पुरवठा करतात. परिणामी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगले उजाड होत आहेत.

मागील महिन्यात चिपळूण येथे वनविभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईनंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, खेड तालुक्यात अजून वृक्षतोडीला लगाम लागलेला नाही.

तालुक्यातील माणी, सवेणी व त्या भागातील गावात मागील महिन्यात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याची चर्चा होती. त्याची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले असता तोडलेले लाकूड रात्रीच गायब केले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे तालुक्यात वनविभागाची गावागावात गस्त सुरू आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.