अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूरी येथे हिंदू भाविकांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करावी.

सकल हिंदू समाज, लांजाच्या वतीने मागणी, , लांजा तहसीलदारांना निवेदन सादर

लांजा (प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील राहूरी गुहा येथे हिंदू भाविकांवर झालेला हल्ला हा भ्याडहल्ला असून याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सकल हिंदू समाज, लांजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी लांजा तहसीलदारांमार्फत गृहमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहा ,तालुका- राहुरी, जिल्हा -अहिल्यानगर येथे श्री कानिफनाथ देवस्थान आहे. या देवस्थानात काही भाविक आणि पुजारी हे भजन म्हणत होते. दीपावलीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालू असताना अचानकपणे समाजकंटकांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’ असे म्हणत मंदिरातील पुजारी आणि भावीक यांना मारहाण करून तेथील पूजा आणि भजन बंद पाडले होते.

ऐनदिवाळीत हिंदूंवर आक्रमण करणे अतिशय गंभीर आहे. हे कमी होते की काय म्हणून ५८ हिंदूवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हिंदूंवरील गुन्हे तात्काळमागे घ्यावेत, तसेच गावातील शांतता, सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे षडयंत्र आहे का ? या घटनेमागे कोण मास्टरमाइंड आहे? याचीही सखोल चौकशी करावी.
या गावात मंदिराच्या बाजूला बेकायदेशीर दर्गा निर्माण करून मंदिराची ३२ एकर जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच तेथे नियमित दर गुरुवारी आणि अमावस्येला नित्य पूजा अर्चा केली जाते. असे असताना थेट हिंदूंवर आक्रमण करण्यात आले, हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदू समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

गावातील कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न आहे. सदर घटनेचा सकल हिंदू समाज जाहीर तीव्र निषेध व्यक्त करत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाज, लांजाच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवेदन तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करताना सकल हिंदू समाज,लांजाचे सचिन कदम, डाॅ. समीर घोरपडे, भैरूलाल भंडारी व अन्य उपस्थित होते.