प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष कदम

उपाध्यक्षपदी अरविंद पालकर

चिपळूण (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी संतोष वसंत कदम, उपाध्यक्षपदी अरविंद कृष्णा पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पतपेढीच्या प्रधान कार्यालयात प्राधिकृत अध्यासी अधिकारी सुधीर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली.

नवनिर्वाचित संचालक, संचालिका, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पतपेढीचे कर्मचारी यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. पतपेढीचा कारभार अधिक पारदर्शक, निःपक्षपाती करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांनी आपल्या मनोगतात सांगितले. पतपेढीच्या सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलला ९, महायुती पॅनेलला ७ जागा मिळाल्या आहेत. अध्यक्ष संतोष कदम, उपाध्यक्ष अरविंद पालकर यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

तालुक्यातील ओमळी गावचे संतोष कदम सुपुत्र असून गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे. नुकत्याच झालेल्या प्राथमिक शिक्षक पद्धतीच्या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आणि या प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.