ब्राह्मण संघाची वार्षिक सभा उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात संपन्न झाली. ५६ सभासद सभेला उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष मुकुंद कानडे होते. अन्य पदाधिकारीही होते.

सभेच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सर्व कार्यक्रम संपन्न झाले. यात परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांचा, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे जे विश्वस्त मंडळ निवडून आले त्यातील ब्राह्मण सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच डॉ.तेजानंद गणपत्ये यांचाही ते कोकणातील पहिले लोहपुरुष झाल्याबद्दल सन्मान करायचा होता परंतु काही कारणाने ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी तसे सांगितलेही होते. तसेच चिपळूणचे सुप्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे यांची २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

या सभेत २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त. आणि कार्यकारी मंडळाची निवड झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वानी मिळून परस्पर सहकार्याने काम करूया असे सांगितले. डॉ. जयंत मेहेंदळे यांनी आभार मानल्यावर चहापान होऊन सभा संपन्न झाली.