‘पाणचिरा’ या दुर्मीळ हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे शिरोडा समुद्र किनारी दर्शन

वेंगुर्ले | दाजी नाईक : संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत नोंद असणाऱ्या ‘इंडियन स्किमर’ ( indian skimmer ) म्हणजेच ‘पाणचिरा’ या पक्ष्याचे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा किनाऱ्यावर दर्शन झाले. ( indian skimmer ) महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद आहे. महाराष्ट्रात पाणचिरा पक्ष्याच्या फार कमी नोंदी असून अधिवास नष्टतेमुळे या पक्ष्याला संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. अशी माहिती पक्षी प्रेमी जयदीप पडवळ व प्रवीण सतोस्कर यांनी दिली.

थंडीची चाहूल लागताच राज्यात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणथळ पक्ष्यांचा समावेश आहे. फ्लेमिंगो, उचाट्या, हळदीकुंकू बदक, वारकरी बदक, थापट्या बदक हे पक्षी खाडी प्रदेशात दिसू लागले आहेत. तर कुरव, पाणटिवळा, तुतारी, टिलवा, चिखल्या या पक्ष्यांच्या विविध प्रजाती किनाऱ्यांवर दिसत आहेत. अशातच ‘पाणचिरा’ या दुर्मीळ हिवाळी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडले आहे.
पाणचिरा’ पक्ष्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ही पहिलीची नोंद असल्याची माहिती या पक्ष्यावर मध्य भारतात काम करणाऱ्या ‘बीएनएचएस’च्या संशोधिका परवीन शेख यांनी दिली. तसेच हा पक्षी पिल्लू अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, जेव्हा या पक्ष्यांचा प्रजननाचा हंगाम नसतो त्यावेळेस हे पक्षी किनारी भागातील पाणथळींवर स्थलांतर करतात. सिंधुदुर्गात आलेला पाणचिरा हा सुरव पक्ष्यांच्या थव्यासोबत आल्याची शक्यता शेख यांनी व्यक्त केली आहे.