राजापुरात बिबटयाच्या हल्ल्यात भालावलीतील युवक बालंबाल बचावला

हातावर व पायाच्या मांडीवर ओढले ओरखडे

राजापूर धारतळे मार्गावर बारसू येथील घटना

राजापूर |प्रतिनिधी : आपल्या मित्रासोबत दुचाकीवरमागे बसून भालावली येथून राजापूरकडे येत असताना राजापूर धारतळे मार्गावर धोपेश्वर बारसू हद्दीतील वळणावर दुचाकीवर पाठीमागून बिबटयाने धडक देत हल्ला केल्याने या हल्ल्यात राज मारूती भोसले (१८) रा. भालावली वरची भंडारवाडी हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्या हातावर व मांडीवर बिबटयाने पंचाने ओरखडले आहे. आरडा ओरड केल्याने बिबटयाने जंगलात धुम ठोकल्याने सुदैवाने हा युवक बालंबाल बचावला आहे.

शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. मात्र अत्यंत निर्जन स्थळी रस्त्यावर अशा प्रकारे बिबटयाने केलेल्या हल्ल्यात हा तरूण बालंबाल बचावला आहे. मात्र अशा प्रकारे तालुक्यात मोठया प्रमाणावर बिबटयांच्या वावरांमुळे ग्रामस्थांमध्ये आणि खास करून वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज भोसले हा शनिवारी रात्री वाडीतील आपला मित्र राहुल श्रीधर भोसले याच्या सोबत दुचाकीवरून राजापूरकडे येत होता. यावेळी राहुल दुचाकी चालवत होता व तर राज हा त्याच्या पाठीमागे बसला होता. हे दोघे बारसू परीसरातुन पुढे येत असताना बारसू येथील वळणावर अचानक पाठीमागून बिबटयाने दुचाकीला धडक दिली. यावेळी हे दोघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. दरम्यान बिबटयाने यावेळी राज याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या हातावर व मांडीवर बिबटयाने नखाने ओरखडे ओढले आहेत. या दोघांनी आरडा ओरडा केल्यानंतर बिबटयाने जंगलात धूम ठोकली.

यानंतर तात्काळ राज याला राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. दरम्यान नातेवाईकांनाही दुरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. राजापूर वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षण श्री. कुंभार, विजय म्हादये हे तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले. या ठिकाणी राज याच्यावर वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून तातडीने उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती बरी असल्याने त्याला रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.

या घटनेबाबत तात्काळ वनपाल सदानंद घाडगे यांनी दखल घेते घटनास्थळी जाऊत पंचनामा केला आहे. तर बिबटयाच्या बंदोबस्ताबाबतही तातडीने काय उपाययोजना करता येत याबाबत वनविभागाचे अधिकारी सोमवारी या परीसरात प्रत्यक्ष पहाणी करून निर्णय घेणार आहेत.