खेड(प्रतिनिधी) संविधान दिनाचे औचित्य साधून खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्यावतीने संविधान जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती खेड व तालुक्यातील पुरोगामी संघटनांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रम खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. आर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गोवळकर, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मुंबई अध्यक्ष संघराज तांबे, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे स्थानिक अध्यक्ष राजरत्न तांबे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खेडेकर, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, युवा मंचचे अध्यक्ष संतोष मोरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा दिक्षिता तांबे, तिसे ग्रामपंचायतीच्या सरपंच अपूर्वा जाधव, संविधान व्याख्याते अॅड. अशोक निकम, पुरोगामी चळवळीचे पदाधिकारी, विविध शाखा व गटातील कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
या रॅलीची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथून होऊन मराठा भवन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, खेड बाजारपेठ, तीन बत्ती नाका, जिजामाता उद्यान येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय मार्गे एस. टी. स्टॅन्ड करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सांगता करण्यात आली.
तद्नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते अॅड. अशोक निकम यांनी सांगितले की भारतीय संविधान हे व्यक्ती व समाज उन्नतीसाठी राबविण्यात येणारा एक प्रोजेक्ट असून प्रत्येक सरकारने डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या दृष्टिकोनातून राबविणे गरजेचे आहे.
भारताचे संविधान सर्वानी समजून घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी संविधानाच्या मार्गाने चालले पाहिजे. राष्ट्र हा कोणत्याही धर्माचा नसावा. म्हणून आपला देश धर्म निरपेक्ष आहे. देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. आपण कायद्या समोर सर्व समान आहोत. संविधानाची मूल्य जपण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहीले पाहिजे असे मत मांडले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे अध्यक्ष सचिन गोवळकर म्हणाले की, संविधानाने आपल्याला काही कर्तव्य दिली आहेत. त्यामध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हि कर्तव्य जर आपण पार पाडली तर आपला देश लवकर अंधश्रद्धेतून मुक्त होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागुराम तांबे, सूत्रसंचालन दिपक कांबळे व आभार प्रदर्शन विनोद कांबळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सभासदांचे योगदान लाभले










