दापोली : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून जप्त केलेला वाळू साठा व ८ लाख रुपये किमतीचे सक्शन पंप, बोट व अन्य साहित्य चोरून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेले शिरवणे गावचे सरपंच सागर शांताराम रेमजे व अन्य दोन संशयितांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शिरवणे गावाजवळ असलेल्या कोडजाई नदीपात्रात महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी यांनी १३ नोव्हेंबर रोजी कारवाई करत नदी किनारी असलेल्या जागेत साठा केलेली सुमारे १० ते १२ ब्रास वाळू तसेच नदीपात्रात सक्शन पंप बसविलेली बोट व अन्य साहित्य असा एकूण ८ लाख १६ हजार रुपये किंमत असलेल्या मुद्देमाल जप्त करून तो शिरवणे येथील पोलीस पाटील उमेश तुळशीराम येलवे यांचे ताब्यात दिला होता. मंडळ अधिकारी सीमा कात्रुट दापोली पोलीस ठाण्यात वाळू चोरी करणाऱ्या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
मात्र २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजणेचे सुमारास सदर जप्त मुद्देमाल ज्या ठिकाणी ठेवलेला होता त्या शिरवणे येथील जुवाडा येथे पोलीस पाटील उमेश तुळशीराम येलवे गेले असता त्यांना तो मुद्देमाल दिसला नाही, या मुद्देमालाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात पप्पू कोळी (रा. ठाणे, सध्या दापोली), शिरवणेचे सरपंच सागर शांताराम रेमजे, सिद्धेश सुरेश करमरकर (रा. कोल्हापूर), किशोर गुरव (रा. दाभीळ) या ४ संशयीतानी ४ हजार रुपये किमतीची सुमारे ३ ते ४ ब्रास वाळू, ८ लाख रुपये किमतीचे सक्शन पंप, बोट व त्यावरील सर्व साहित्य असा ऐवज महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस पाटील येलवे यांच्या संमत्ती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
दापोली पोलिसांनी या ४ संशयितांवर गुन्हाहि दाखल केला होता, त्याआधारे शिरवणेचे सरपंच सागर शांताराम रेमजे, सिद्धेश सुरेश करमरकर (रा. कोल्हापूर), किशोर गुरव (रा. दाभीळ) या संशयीताना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या तिघांनाही एक दिवसाची पोलीस कोठड़ी सुनावली आहे.










