खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील पुरे खुर्द- काळकायवाडी या दुर्गम भागात बसलेल्या ग्रामस्थांना मूलभूत सोयी सुविधांअभावी गैरसोयींनाच समोर जावे लागत आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच बनला होता. ही बाब जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाणीप्रश्न मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जल फाऊंडेशनने थेट घरापर्यंतच पाणी आणून देत पाणी प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले आहे
दुर्गम भागात वसलेल्या लोकवस्तीकडे जाण्यासाठी रस्त्याचा थांगपत्ताच नाही. काही वर्षापूर्वी येथे वीज पोहचली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटीलच बनला होता. काही अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणून ग्रामस्थांना तहान शमवावी लागत होती. उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी हंबरडाच फोडावा लागत होता. येथील ग्रामस्थांनी पाण्याची समस्या जल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली होती .
जल. फाऊंडेशनने लोकसहभागातून पाणीप्रश्न संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला. विहिरीतून थेट घरापर्यंत पाणी पोहचवण्याची मौलिक कामगिरी जल फाऊंडेशनने बजावली आहे. वर्षानुवर्षे सतावणारा पाणीप्रश्नही संपुष्टात आल्याने ग्रामस्थांनी सुटेकचा नि:श्वास टाकला आहे.











