खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गाची झालीय चाळण! कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च

खेड(प्रतिनिधी) खेड-भोस्ते रेल्वेस्थानक मार्गावर ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रूपयांचा निधी खर्चूनही या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याच मार्गावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सातत्याने प्रवास देखील सुरू असतो. मात्र तरीदेखील मार्गाच्या डागडुजीसाठी संबंधित खात्याला आदेश देण्याची तसदी घेतली जात नसल्याने वाहनचालकांची कसरत कायम आहे.

रेल्वेस्थानकात ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. याशिवाय रिक्षा व्यावसायिकांच्यादृष्टीनेही हा मार्ग सोयीचा ठरत आहे. ग्रामसडक योजनेतून वेरळ- भोस्ते कोंडिवली शिव मार्गावर तब्बल ९ कोटीहून अधिक रुपयांचा खर्च करून रस्ता खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत कायमच आहे.

रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यापासूनच कामाच्या दर्जाबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले होते. या मार्गावरील दर्जाहीन कामाबाबत ग्रामस्थांनी सातत्याने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रताप केला आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून खड्ड्यांमुळे अपघातही घडत असल्याने वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

याच मार्गावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ‘शॉर्टकट’ प्रवास देखील सातत्याने सुरू असतो. मात्र तरीदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित खात्याला मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी ‘आदेश’ देण्यास सवडच मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी मार्गावर पडलेल्या खड्ड्या मध्ये दगडमिश्रित माती टाकून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र सद्यस्थितीत मार्ग पुरता उखडला असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींनीही मौन धारण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.