चार लाख दहा हजारांचा मुद्देमाल केला जप्त
देवरुख : गुरांची अवैध वाहतुक करणारी एक बोलेरो पीकअप गाडी मंगळवारी रात्री देवरुख – साखरपा मार्गावरील मुरादपुर येथे पकडुन कारवाई करुन दोन जणांवर देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यात ४ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल देवरुख पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. राजेश वसंत रवंदे (वय २२ वर्ष, रा. सावर्डे, ता. शाहुवाडी), युवराज भिकाजी कांबळे (वय ४४ वर्षे, रा. निळे, ता. कोल्हापुर) यांच्यावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रवंदे व युवराज कांबळे यांनी एकमेकांचे संगनमताने बोलेरो पीकअप गाडी क्रमांक एमएच ०७, पी १९७२ मधुन प्राण्यांच्या वाहतुकीचा परवाना व ड्रायव्हींग लायन्स नसताना देखील गाडीचे हौद्यामध्ये ७ गाई व १ पाडी अशा आठ पाळीव जनावरांना वेदना होईल असे आखुड दोरीने बांधुन त्यांना हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटीने गाडीचे हौद्याचे क्षमतेपेक्षा वाजवी भरून गुरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना सापडले आहेत.यावरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मुरादपुर येथील महाबळेश्वर मंदिर येथे ही बोलेरो पीकअप गाडी देवरूख येथील तरूणांच्या मदतीने देवरूख पोलीसांनी पकडली. ७ गाई, १ पाडी सह ३ लाख ५० हजार रूपये कीमतीची बोलेरो पीकअप गाडी असा एकूण ४ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल देवरूख पोलीसांनी जप्त केला आहे.
दिलेल्या फीर्यादीनुसार राजेश रवंदे व युवराज कांबळे यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब) व ९ सह प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (डी), (एच) (आय) सह, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ कलम, ४७ ते ५६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह, मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १९२ (अ), ३ (१)/ १८१, भा.द. वि. कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.












