ओटवणे येथील जमीन वादातून काकाचा खून केल्या प्रकरणात पुतण्या शैलेश नाईक दोषी.

सिंधुनगरी | प्रतिनिधी :  जामीन विक्री व्यवहाराच्या वादातून झालेल्या हल्ल्यात स्वताच्या काकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पुतण्या संशयित ओटवणे येथील शैलेश वसंत नाईक याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याप्रकरणी या आरोपीची शिक्षा राखून ठेवली असून ते निकाल पत्र देताना न्यायालय जाहीर करणार आहे.

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे करमळ गाळू येथे १७ ऑक्टोबर २०२१ रोजी संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याने काकाने जमीन विक्री करून आपल्याला हिस्याचे पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून काकावर फावड्याने हल्ला केला होता. यात प्रभाकर नाईक यांना डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. मात्र प्रभाकर नाईक यांचा उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर संशयित आरोपी शैलेश वसंत नाईक याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष आणि वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयित शैलेश याला प्रभाकर नाईक यांच्या मृत्यू प्रकरणी दोषी ठरविले आहे.