डाॅ.बाबासाहेब हे मानवासाठी व समाजाच्या कल्याणासाठी जगले! : भास्करराव पेरे पाटील
गुहागर (प्रतिनिधी):माणसानं दीनदलित- गोरगरिबांच्या कामी आलं पाहिजे..मानव धर्म जपला पाहिजे असे सांगताना
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवासाठी जगले..समाजासाठी जगले..समाजाच्या कल्याणासाठी जगले.. म्हणून आपण आज त्यांना अभिवादन करताना रांगा लावतो. माझं काहीतरी पुर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून मला या निमित्तानं बाबासाहेबांच्या अस्थिंचं दर्शन घ्यायचा योग आला, हे सहजासहजी घडत नाही,असे भावनिक उद्गारही प्रसिद्ध वक्ते व पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी काढले.
विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त बौद्ध विकास मंडळ, वरवेली यांनी आयोजित केलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी माता रमाई सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश पवार, मंडळाचे प्रमुख विश्वस्थ संजय पवार,सरपंच नारायण आग्रे,उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामसेवक महेंद्र भुवड, वैभव पवार,सुनिल जाधव,पत्रकार गणेश किर्वे, ,दिशा पवार, पोलीस पाटील सुजित शिंदे, व बौदध विकास मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेरे पाटील पुढे म्हणाले की
वरवेली गावाचा हा परिसर.. हे गाव स्वच्छ- सुंदर पवित्र असल्याचा उल्लेख करून एवढंच नव्हे तर बाबासाहेबांचा अस्थिकलशही येथे आहे.
गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे..एकमेकांच्या कामी आलं पाहिजे असे सांगून एकमेकांना माणसांना कामी येणं ,यात कसले उपकार? आपल्यापेक्षा पशूपक्षी एकमेकांना जास्त जपतात हे सउदाहरण समजावून सांगितलं. महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब हे समाजासाठी जगले म्हणून ध्यानात राहिले.नाहीतर आज काल श्रीमंत माणसं देखील लक्षात राहत नाहीत,असेही ते म्हणाले .
दुबईचं उदाहरण देत तिथे पाच वर्ष पाऊस पडत नसतानादेखील 160 व्या मजल्यावर पाणी पोहचलं.इकडे गावं वाहून जातात तरी पहिल्या मजल्यावर पाणी पोहचत नाही,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल पवार यांनी केले.












