तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा 12 रोजी देवदीपावली उत्सव

गुहागर (प्रतिनिधी): तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा देव दीपावली उत्सव मंगळवार दिनांक 12 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे यावेळी गावामध्ये जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे .

गुहागर तालुक्यातील तळवली येथील ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा देव दीपावली उत्सव तळवली गावाच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.ग्रामदेवता श्री सुकाई देवी जागृत देवस्थान असून अनेकांचे श्रद्धास्थान आहे.विविध ठिकाणाहून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शिमगोत्सवात देखील मोठ्या उत्साहाने देवीचा उत्सव साजरा केला जातो.बाहेरगावी कामानिमित्त असलेले भाविक यावेळी देवीच्या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.देव दीपावली निमित्त साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवात देवीला रूपे लावण्यात येते तसेच श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते.यावेळी गावासहित पंचक्रोशीतून येणाऱ्या ग्रामस्थांना महाप्रसादाचे नियोजन देखील गावाच्या वतीने करण्यात येते.

यावेळी पार पडणाऱ्या या उत्सवामध्ये सकाळी 8.30 वा श्री सत्यनारायण महापूजा व हळदीकुंकू, सकाळी 11.30 वाजता महाआरती, दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 4 ते 6.30 वा भजन,संध्या.7 वाजता हरिपाठ(वारकरी मंडळी तळवली), रात्री 9.30 वाजता श्री सुकाई देवी बहुरंगी तमाशा तळवली व रात्री 11 वाजता श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली यांचा “कन्यादान” हा दोन अंकी नाट्यप्रयोग पार पडणार आहे तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुकाई देवी ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने केले आहे.