वेंगुर्ले l दाजी नाईक : शिरोडा गावची ग्रामदेवता श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आणि रविवार हा आठवडा बाजाराचा दिवस असतानाही या मार्गाने वाहतूक करणाऱ्या डंपर गाड्यांची वाहतूक स्थानिक ग्रामस्थांनी आज रोखली. एकूण चार तास चाललेल्या आंदोलनाबाबत चर्चेनंतर यापुढे असा प्रकार होणार नाही असे डंपर व्यवसायिकांनी स्पष्ट केल्यानंतर या विषयावर पडदा पडला.
शिरोडा गावात आज जत्रोत्सवाची लगबग आहे. तसेच आठवडा बाजाराचा दिवसही असल्याने बाजारामध्ये गर्दी आहे. असे असताना रेडी येथून खनिज वाहतूक करणारे डंपर रेडी शिरोडा मार्गे वाहतूक सुरू होती. या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या आणि ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात येताच काही स्थानिक ग्रामस्थांनी शिरोडा मिठागर येथे वाहतूक होणाऱ्या डंपर गाड्यांना रोखून आंदोलनाचा पवित्र घेतला. यावेळी मयुरेश शिरोडकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, माजी सदस्य अमित गावडे, सदस्या अर्चना नाईक, शहर अध्यक्ष संदीप धानजी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, प्राजेश गावडे, बबन गावडे, आबा राऊत, संतोष सोन्सूरकर, रुपेश परब, दादा गावडे, गणेश शेट्ये, कौशिक परब, उल्हास गावडे, विठ्ठल शेट्ये, गणपत राऊत व ग्रामस्थ उपस्थित होते.
डंपर वाहतूक रोखल्यामुळे रेडी व शिरोडा गावातील ग्रामस्थ मिठागर येथे आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. बराच कालावधी चाललेल्या चर्चेअंती. गावात कुठचाही कार्यक्रम असताना त्यादिवशी डंपर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे यावेळी ठरविल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी शिरोडा पोलीस सही उपस्थित होते.












