कणकवली येथील रामचंद्रचे सैनिक बनण्याचे स्वप्न अधूरेच राहीले
कणकवली : पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमी च्या विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग पर्यटन सहल आली होती. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे पाहून झाल्यावर विद्यार्थ्यांची सहल देवगड येथे आली. कुणकेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर पुढील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी विद्यार्थी देवगड पवणचक्की येथील सेल्फी पॉईंटवर गेले. त्यानंतर खाली उतरूण त्याठिकाणी असलेल्या समुद्राच्या दिशेने निघाले. त्यातील काही विद्यार्थ्यांना समुद्र स्नानाचा मोह आवरला नाही. त्यामुळे एकूण सहाजण समुद्र स्नानासाठी समुद्रात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एकामागोमाग एक असे एकूण सहाजण पाण्यात बुडाले. त्यातील चार मुली मृतावस्थेत आढळून आल्या. त्यातील एक मुलगा सुदैवाने बचावला तर एकजण बेपत्ता होता. २४ तासानंतर शोध मोहिमेला यश आले आणि बेपत्ता असलेला विद्यार्थी रविवारी सायंकाळी ३.४५ वा.च्या देवगड किल्ला येथील स्मशानभूमी नजिकच्या खडकाळ भागात मृतावस्थेत आढळून आला. रामचंद्र उर्फ (राम) घन:श्याम डिचोलकर (२०) रा. आशिये – टेंबवाडी कणकवली असे त्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र (राम) शिक्षणाच्याबाबतीत खुप हुशार आणि जिद्दी होता. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून तो पुणे येथे शिक्षणासाठी राहत होता. रामचंद्र (राम) याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे वडिल कणकवली येथील एका खाजगी रूग्णालयात सफाईचे काम व शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र, असलेल्या भावनांमध्ये राम हा अत्यंत हुशार आणि जिद्दी असल्यामुळे त्याला सैनिक अकॅडमी पुणे येथे शिक्षणासाठी घातले होते. सैनिक अकॅडमी पुणेच्या सहलीमध्ये सहभागी होऊन तो सिंधुदुर्गात सहलीसाठी आला होता. देवगड येथे गेल्यावर तो कुणकेश्वर येथील आपली बहिणी पुजा तेली हिच्याजवळ गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुणकेश्वर मंदिर दर्शन, सेल्फी पॉईंट येथे थोडावेळ व त्यानंतर थेट विद्यार्थ्यांसमवेत समुद्राच्यादिशेने निघाला. त्यानंतर सोबत असलेल्या सहकारी विद्यार्थ्यांना समुद्र स्नानाचा मोह न आवरल्याने तो त्या विद्यार्थ्यांसमवेत समुद्रात उतरला. एकामागोमाग एक असे चार मुली व एक मुलगा पाण्यात बुडून मृत झाले होते. व राम हा शोध मोहिम करून देखील आढळून आला नव्हता. अखेर रविवारी तो मृतावस्थेत आढळून आला.
रामचंद्र (राम) त्याच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, बहिण, तसेच एक विवाहित बहिण असा परिवार आहे. घटनास्थळी राम हा मृतावस्थेत सापडल्यानंतर बहिणीने हंबरडा फोडला. त्यानंतर पुढील कारवाई करून रामचंद्र चा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रामचंद्र (राम) च्या निधनाने आशिये गावासह मित्रपरिवारातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.











