
पारंपरिक मासेमारी करताना होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने कर्जबाजारी झालो
तोंडवळी येथील पारंपरिक मच्छिमारांनी मांडली स्पष्ट भूमिका
गिलनेट धारकांकडून एलईडी लाईट चा वापर करून माश्यांची लयलूट : पारंपरिक रापण धारक तसेच आमचेही नुकसान होत असल्याचे मांडले मत
मालवण | प्रतिनिधी : गेली अनेक वर्षे आम्ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत होतो. मात्र मागील काही वर्षात पारंपरिक मासेमारी करताना होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. या दुष्ट चक्रातुन बाहेर पडण्यासाठी आम्ही ‘आधुनिक रापण’ मासेमारी पद्धत स्वीकारली आहे. अशी भूमिका तोंडवळी येथील पारंपरिक मच्छिमारांनी मांडली आहे.
मासेमारी हंगामात रापण क्षेत्रात गिलनेट धारक घुसखोरी करून बांगडा, तारली, पापलेट, कोळंबी यांची लूट करतात. यामुळे देवबाग, वेंगुर्ला, मालवण, धुरीवाडा, तळाशील, तोंडवळी, वायंगणी, आचरा, मुणगे, मीठबाव, कातवण, कुणकेश्वर, देवगड याठिकाणी रापण बंद पडण्याच्या मार्गांवर आहेत. याकडे मत्स्य विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. जोपर्यंत या सर्वावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमच्या आधुनिक रापण व्यवसायावरही कारवाई नको. असे स्पष्ट कारण्यात आले आहे.
आधुनिक रापण परवाना मिळावा या मागणीचे निवेदन आम्ही यापूर्वी मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. तसेच आज सोमवारी मालवण मत्स्य कार्यालय येथे अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनाही आम्ही तोंडवळी येथील ग्रामस्थ पारंपरिक मच्छिमार यांनी सोमवारी दुपारी निवेदन दिले. असे सांगत आयोजित पत्रकार परिषदेत तोंडवळी येथील मच्छिमार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी हनुमंत देऊलकर, वासुदेव पाटील, हर्षल केळुसकर, महेश
मालंडकर, बाबू पाटील, झकास खावणेकर, संजय तारी, नामदेव तारी, कल्पेश नाईक, पराग केळूसकर, प्रमोद पाटील, विजय रेवंडकर, हेमंत खडपकर, देवराज केळुसकर, रामचंद्र मायबा, विजय खवणेकर, रामचंद्र तांडेल, कीर्तिराज चोडणेकर, हरिश्चंद्र मालंडकर, आनंद झाड, राहुल पाटील तुषार तोरसकर, हर्षद पाटील, आशिष शेलटकर, विठ्ठल सादये यासह अन्य मच्छिमार ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसाळी बंदी कालावधीत होणारी मासेमारी, एलईडी लाईट पद्धतीने म्हाकूल, कटर मासेमारी, रापण क्षेत्रात होणारी गिलनेट मासेमारी या विषयावरही लक्ष वेधण्यात आले आहे.
मस्त विभागाला दिलेल्या निवेदनात तसेच भूमिका मांडताना तोंडवळी येथील पारंपरिक मच्छिमार ग्रामस्थ यांनी सांगितले, गेली कित्येक वर्ष आम्ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत होतो. आता आधुनिक रापण ही मासेमारी पद्धत आम्ही स्वीकारली आहे. सहकार माध्यमातून एकत्र येत कर्ज काढून दागिने गहाण ठेवून आम्ही या व्यवसायात उतरलो आहोत. आधुनिकतेची कास आम्ही धरत आहोत. मालवण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आधुनिकतेची कास धरा प्रगती करा असे म्हटले. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आधुनिकतेची कास धरा सांगितले. या मासेमारी पद्धतिमुळे समुद्रात कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक नुकसान होत नाही. तसेच मिळालेल्या माश्यानाही जास्त भाव मिळतो. तरी आम्हाला आधुनिक रापण करण्यास परवाना द्यावा अन्यथा संपुर्ण राज्यातच आधुनिक रापण बंद करा. आम्ही सर्वच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो. असेही मच्छिमार यांनी सांगितले.
राज्याच्या किनारपट्टीवर अन्य मलपी हायस्पीड बोटी, एलईडी बोटी येऊन मासळीची लयलूट करतात. मात्र मत्स्य विभागाकडून त्यावर कारवाई होत नाही.
याबरोबर गेल्या पाच वर्षात गिलनेट मासेमारी करणारे मच्छिमार सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एलईडी लाईटच्या साहाय्याने म्हाकूल माश्यांची लयलूट करतात. यामुळे पारंपरिक रापण धारक तसेच आम्हा मच्छिमारांचे नुकसान होत आहे. काहीजण कर्जबाजारी पणामुळे हतबल झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आधुनिक मासेमारीचा मार्ग निवडण्यात आला आहे. असे सांगण्यात आले आहे.
एलईडी वापर करून म्हाकूल माश्यांची लयलूट करणाऱ्या गिलनेट धारकांवर कोणती कारवाई केली? याचीही माहिती मत्स्य विभागाने द्यावी. अशी मागणीही करण्यात आली आहे.
1 जून ते 31 जुलै या मासेमारी बंदी कालावधीत माश्यांचा प्रजनन कालावधी असतो. त्यामध्ये बेसुमार मासेमारी करून गेली कित्येक वर्षे मत्स्यबीज नष्ट करण्याचे काम सुरु आहे. बंदी कालावधीतील मासेमारी व मासे विक्री यावर कायदा 1981 कलम 14 नुसार कारवाई अधिकार असताना मत्स्य विभाग कारवाई करत नाही. यापुढे ही मासेमारी बंद व्हावी. कारण खाडीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमार यांना याचा फायदा होणार आहे. तसेच समुद्रातील मत्स्य बीज वाढ होण्यास मदत होणार आहे.
मत्स्य व्यवसाय मंत्री यांना निवेदन
वाघेश्वर मिनी पर्ससीन मच्छिमार यूनियन तोंडवळी यांनी राज्याचे मत्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन दिले आहे. आम्ही पिढ्यानं पिढ्या पारंपरिक मासेमारी करतो. मात्र निर्यात कंपनी पारंपरिक मच्छिमार गिलनेट यांचा मासेमाल घेत नाहीत. कारण टिकाऊपणा दर्जा कमी असतो. या सर्वांचा परिणाम या व्यावसायावर अवलंबुन आम्हा मच्छिमारांवर होत आहे. त्यामुळे आधुनिक प्रकारची पर्ससीन नेट मासेमारी आम्ही करणार आहोत. त्यासाठी मिनी पार्ससीन मासेमारी करता नौकेला परवाना मिळावा. अशी मागणी करण्यात आल्याचे मच्छिमारांनी सांगितले.











