Devgad: मारहाण झालेल्या तांडेल रणजीत डोरलेकर याचा मृत्यू

अंतर्गत वादातून हल्ला झालेला बोटीवरील तांडेल रणजीत बबन डोरलेकर याचा काल रात्री उशिरा गोवा बांबुळी येथे मृत्यू झाला आहे.

काय घडले काल… वाचा

देवगड: भर समुद्रात झालेल्या भांडणाचे पडसाद देवगड बंदरात उमटले असून बेधुंद खलाशाने आपल्या सहकारी तांडेल व दोन खलाशांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर नवका जाळण्याचा प्रयत्न केला असून नौका जळाल्याने सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास देवगड समुद्रात घडली. या मारहाणीच्या घटनेत बोटीवरील तांडेल रणजीत बबन डोरलेकर (राहणार गावडे आंबेरी जिल्हा रत्नागिरी) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गोवा बांबुळी येते रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित दोन खलाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी सावंत यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्याचबरोबर फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. देवगड बंदरातील पंकज प्रभाकर पेडणेकर (राहणार खाक्षी ) यांची मुक्ताई ही यांत्रिकी बोट गुरुवारी मच्छीमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. सोमवारी पहाटे दोन वाजता बोटी वरील खलाशी आनंद तुकाराम तांबे ( राहणार राजापूर) यांनी तांडेल व इतर खलाशी यांच्याबरोबर भांडण करण्यास सुरुवात केली. भांडणाचे स्वरूप वाढण्याच्या स्थितीत असल्यामुळे बोटीवरील सहाय्यक तांडेल रणजीत डोरलेकर यांनी याबाबतची कल्पना फोनवरून तात्काळ मालक पेडणेकर यांना दिली. यावेळी पेडणेकर यांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून तात्काळ बंदरात या असे सांगितल्यावर तांडेल डोरलेकर यांनी नौका थेट देवगड बंदरात आणल्यावर पहाटे 4:30 च्या सुमारास बोट नांगरावर उभी असताना खलाशी आनंद तांबे यांनी पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत भांडण्यास सुरुवात केली.

खलाशी तांबे यांनी सुरुवातीला शिवीगाळ करून आपले स्वतःचे डोके केबिनच्या काचेवर आपटून स्वतःला जखमी केले. यानंतर बर्फ फोडण्याचा लोखंडी भाला घेऊन त्याने प्रथम तांडेल रणजीत बबन डोरलेकर यांच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये सहाय्यक तांडेल रणजीत बबन डोरलेकर गंभीर जखमी झाले. अशा परिस्थितीत घाबरून जीव वाचवण्यासाठी इतर दोघांनी पाण्यात उडी घेतली व पोहत समुद्रकिनारा गाठला तर दोन खलाशी तावडीत सापडले यातील शशिकांत तुकाराम पतयाने व राजेश रघुनाथ आंबेरकर ( दोघेही राहणार गावडे आंबरी) यांच्याही डोक्यावर त्याने प्रहार केला. याच्यामध्ये एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेची माहिती फोनवरून पेडणेकर यांना देतात ते सकाळी पाच वाजता दाखल झाले. यावेळी बेधुंद झालेल्या खालशी तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर बोटच पेटवून दिली. यामुळे बंदरात बोटीवर अग्नी तांडव झाले तसेच इतर मच्छीमारांच्या मदतीने बोटी वरील आग विझवीण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

मात्र बोट आगीच्या भक्षस्थानी पडली यात बोटीचे केबिन सहीत सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असून तीनही गंभीर कर्मचाऱ्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. यातील तांडेल डोरलेकर यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गोवा बांबोळी येथे नेण्यात आले आहे. या घटनेचे माहिती पोलीस स्टेशनला देतात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तर ओरोस येथून फॉरेन्सिक पथक दुपारी दाखल झाले असून ते बोटीवर वर तपासणी करीत आहे. देवगड बंदरात सोमवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेने देवगड बंदर हादरले आहे.