बोचरी थंडी आणि मंत्र्यांचे दालन…..!

 

नागपूर विधानभवनातून / संतोष वायंगणकर

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार १६ नोव्हेंबर पासून सुरू झाले आहे. नागपूरातील बोचऱ्या थंडीच्या वातावरणात रविवारी संध्याकाळी नागपूरातील राजभवनमध्ये राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासात दुसऱ्यांदा महाराष्ट्र मंत्री मंडळातील मंत्र्यांनी नागपुर येथे शपथ घेतली. खाते वाटप येत्या दोन दिवसात होइल अशी चर्चा विधानभवनात होत होती.

विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज सोमवारी शोक प्रस्ताव मांडून तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी १४०० कोटीच्या पुरवणी मागण्यांच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी ३६ कोटींच्या निधीलाही मंजूरी दिलेली आहे. ७,४९० कोटीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्या ंमध्ये समावेश आहे.पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव मंत्री ना. उदय सामंत यांनी सभागृहात मांडला.नव्या मंत्री मंडळातील मंत्र्यांचा परिचय करुन देण्यात आला. तसे विधीमंडळाचे सोमवारच कामकाज तहकूब केल्याने विधीमंडळातही मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या दालनाचा ताबा घेण्याचा एक सोहळाच पार पडत होता. नव्याने मंत्री पदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांच्या भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, हितचिंतक येवून शुभेच्छा देत होते. महाराष्ट्र मंत्री मंडळातील मंत्री ना. नितेश राणे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दालनाच्या बाजूचे २१ नंबरचे दालन देण्यात आले आहे. ना. नितेश राणे यांच्या दालनात येवून महाराष्ट्र भरातील जनतेने येवून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्याला कारणही तसेच होते. मंत्री ना.नितेश राणे यांचे वडील रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खा.नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी दमदार कामगिरी खा.नारायण राणे यांनी केल्याचे महाराष्ट्राने पाहीले आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनेकांना ते दिवस आठवले. यावेळच्या हिवाळी अधिवेशनात नितेश राणे, निलेश राणे हे राणे बंधू विधीमंडळात आहेत. हे सिंधुदुर्गसाठी आणखी एक वैशिष्ट्य आहे. नागपूरला अधिवेशनात पहिल्याच दिवशी परभणी प्रकरणाचे पडसादही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करुन करण्यात आले. अधिवेशनातील सोमवारचा पहिला दिवस विधानभवनात मंत्र्यांचे स्वागत, मंत्री पद न मिळाल्याने रुसवे फुगवे आणि मंत्री झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह असे वातावरण नागपूरच्या विधानभवनात पहायला मिळाले. नागपूरला सध्या संत्र्याचा हंगाम आहे. यामुळे मंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांना संत्र्यांचा ज्युस देवूनच स्वागत होत होते.