चिपळूण (प्रतिनिधी) : माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी, चिपळूण पंचायत समिती आणि परशुराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक व सी.ए. वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाले. सदर प्रदर्शनामध्ये माध्यमिक गटातील लक्षवेधी उपकरणांमधून सुमन विद्यालय, टेरव या प्रशालेच्या कुमार समर्थ सुदेश साळवी इयत्ता (९वी) आणि कुमार दक्ष रोहिदास कदम इयत्ता (१०वी) या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ”मल्टीपर्पज स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टीम” या उपकरणाला चिपळूण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला व सदर उपकरणाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शनाच्या शानदार पारितोषिक वितरण सोहळ्यात चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राजमाने साहेब यांच्या हस्ते तसेच पंचायत समिती चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी श्री. इरनाक साहेब, विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, सौ.पटेल मॅडम, सौ.जाधव मॅडम, सौ.शिंदे मॅडम, केंद्रप्रमुख श्री.लांडे सर, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अलोरे प्रशालेचे स्कूल कमिटी चेअरमन पराग भावे, संचालक अतुल चितळे, प्रशालेचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध , चिपळूण तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील, गणित मंडळाचे अध्यक्ष श्री.मोटगी सर, दापोली तालुक्यातील परीक्षक, निवृत्त मुख्याध्यापक श्री. माने सर, आंबतखोल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. भाट सर तसेच तालुक्यातील गणित व विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सुमन विद्यालय टेरव या प्रशालेचा विशेष सन्मान करण्यात आला.
कुमार समर्थ सुदेश साळवी आणि कुमार दक्ष रोहिदास कदम या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अमोल टाकळे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मंदार सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. अलोरे येथील तालुकास्तरीय विज्ञान विज्ञान प्रदर्शनामध्ये लक्षवेधी विज्ञान उपकरणांमधून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सुमन विद्यालय टेरवचे यशवंत विद्यार्थी समर्थ साळवी आणि दक्ष कदम तसेच मार्गदर्शक शिक्षक अमोल टाकळे आणि मंदार सुर्वे (मुख्याध्यापक) यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास कदम, सचिव योगेश कदम, खजिनदार, अजित कदम तसेच संस्थेचे सर्व संचालक, मंडळ, सभासद, ग्रामस्थ, हितचिंतक आणि पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आणि पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.











