रिक्षा व दुचाकी अपघातात पोलीस कर्मचारी राजा राणे जखमी

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा जुन्या महामार्गावरील सावंतवाडी कारागृहालगत बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या रिक्षा व दुचाकी अपघातात सावंतवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र मुरारी उर्फ राजा राणे (रा. इन्सुली ) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातातील रिक्षाचालक नारायण शिवराम राऊळ (रा. नानेली, कुडाळ ) हे आपल्या रिक्षातून काही खाजगी कामानिमित्त पत्नी व मुलीसह सावंतवाडीत आले होते. ते शहरातील कारागृहाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जुन्या मुंबई गोवा महामार्गावर येत असताना महामार्गावरून पोलीस स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या पोलीस कर्मचारी राजेंद्र राणे यांच्या दुचाकीची धडक रिक्षाला बसली. यात राणे हे दुचाकीसह रस्त्यावर कोसळून काही अंतर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताची दोन बोटे रस्त्यावर तुटून पडली.

या अपघातानंतर जखमी राणे यांना तेथील नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी येथे हलवण्यात आले. अपघातानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी राणे यांची विचारपूस केली. दरम्यान, या संदर्भात सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते.