आचरा : आचरा पोलिस ठाणे येथे चालक म्हणून सेवा बजावणारे अभिताज रमेशचंद्र भाबल (वय ४७, रा. तांबळडेग, ता. देवगड) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाबल यांचे यकृत निकामी झाल्याने त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेल्याने त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.
भाबल हे १९९६ आली पोलिस दलात कार्यरत होते. सध्या ते आचरा पोलिस ठाण्यात हवालदार पदावरती चालक म्हणून सेवा बजावत होते. अलीकडील काळात त्यांना तब्येत साथ देत नव्हती. म्हणून कुटुंबीयांनी मुंबईत उपचाराकरिता दाखल केले. यात त्यांचे यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. यकृत कुठे मिळाले नसल्याने त्यांची मुंबईस्थित बहीण कल्याण डोंबिवली महानगरपलिकेच्या माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी धाडसी निर्णय घेत भावासाठी यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शवली. आठवड्या भरापूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. मात्र शस्त्रक्रियेनंतर भाबल यांची प्रकृती चिंताजनक राहिल्याने मंगळवारी मुंबई येथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
मरणाच्या दारातून भावाला सहिसलामत बाहेर काढण्यासाठी त्यांची बहीण माधुरी काळे यांनी यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बहिणीच्या मायेची अनोखी गोष्ट कोकणवासियानी अनुभवली. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होऊनही भाबल यांना उपचारादरम्यान मृत्यूने गाठले. भाबल यांचा मनमिळावू स्वभाव होता. ते उकृष्ट धावपटू व क्रिकेटपटू म्हणून परिचित होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आचरा पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.











