अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
कणकवली : गुरुवारी सायंकाळी कणकवली जानवली येथे कार व दुचाकी यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात कणकवली शिवाजी नगर येथील अंजली अमित साळवी मृत्यूझाला होता. या प्रकरणी कणकवली पोलीस निरिक्षक अमित यादव व यंत्रणेने सर्व ठिकाणच्या चेकपोस्ट ना याबाबत खबर दिली होती. त्यानुसार त्या अपघातात धडक देऊन पसार झालेला चालक अगदी त्याच कारसह शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जनावली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार ( एम एच ०७ क्यू ७८९४ ) ही शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडली. अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी (रा. जामसंडे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानवली येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती.
जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालक कारसह घटनस्थळावरून पसार झाला होता. शिरगाव चेक पोस्टवर सदर इनोव्हा कार आली असता ऑन ड्युटी एएसआय डगरे याना इनोव्हाच्या गाडीचा दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने संशय आला. डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी याने चिरे भरलेल्या ट्रक ने इनोव्हा ला धडक दिल्याची माहिती दिली. ए एस आय डगरे याना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे याना माहिती दिली असता, त्यांना सदर कार जानवली येथील अपघातातील असल्याची शंका आली. त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले.
रात्री उशिरा कार चालकासह कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सदर इनोव्हा कार जामसंडे येथील रुमडे यांच्या मालकीची असून दुरुस्तीसाठी कणकवली येथे देण्यात आली होती. दुरुस्ती नंतर कार जामसंडे येथे नेत असताना हा अपघात घडला. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.










