सावंतवाडी । प्रतिनिधी : कोणी आपल्या मुलांसह तर कोणी मित्र मैत्रीणीसह सायंकाळच्या वेळी उद्यानात मौज मजा करीत असतानाच अचानक धामण जातीचा साप उद्यानात शिरला. त्यामुळे उपस्थित पर्यटकांची व स्थानिक नागरीकांची मोठी घाबरगुंडी उडाली. अखेर सर्पमित्र आशिष माडखोलकर यांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
हा प्रकार आज सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास येथील शिव उद्यानात घडला.
नेहमी प्रमाणे सावंतवाडी शहर व परिसरातील नागरिक तसेच पर्यटक शिव उद्यानात आले होते. याच वेळी हा साप अचानकपणे उद्यानात शिरला व सर्वांचीच पळापळ झाली. यावेळी सावरवाड सरपंच अनिकेत म्हाडगुत यांची पत्नी अनिका म्हाडगुत यांनी अनिकेत यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ फोन करून सर्प मित्र आशिष माडखोलकर यांना बोलाविले. यानंतर माडखोलकर यांनी त्या सापाला पकडुन नैसर्गिक अधिवासात सोडले.












