आवाशी असगणी कामाचे दोनदा भूमिपूजन !

खेड(प्रतिनिधी) पंतप्रधान ग्रामसडक योजनेत मंजूर झालेल्या खेड तालुक्यातील एका रस्त्याच्या कामाचे केवळ पाच दिवसांत दोन वेगवेगळ्या पक्षांच्यालोकप्रतिनिधींकडून दोनवेळा भूमिपूजन करण्यात आल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

एक उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते, तर दुसरे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. हा केवळ श्रेय घेण्याचा प्रकार असल्याची चर्चा आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील आवाशी असगणी हा पाच किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार तो मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या रस्त्याचे एकाच महिन्यात पाच दिवसांच्या फरकाने दोनदा भूमिपूजन झाले आहे.

. ४ डिसेंबर रोजी या रस्त्याचे भूमिपूजन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, तर . ९ डिसेंबर रोजी खासदार सुनील तटकरे यांनी याच रस्त्याचे भूमिपूजन केले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील हे काम नेमके कोणामुळे झाले, याची दोन्ही पक्षांत चढाओढ सुरू आहे.