कोमल दिलवालेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

वाशिम येथील भावाने केली चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील पाग येथे एका उच्चशिक्षित २८ वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. दरम्यान, नोकरी आणि पैसे, दागिन्यांसाठी पती, सासू, सासरे, नणंद यांनी मानसिक दबाव टाकून आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या हिंगोली येथील भावाने चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करू नये, असा पवित्रा घेत मृतदेह ताब्यात देण्यास हरकत घेतली होती. सायंकाळी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आज शुक्रवार दि. २२ रोजी सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

पाग येथील पंचम हर्मनी इमारतीत राहणाऱ्या बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेल्या कोमल सचिन दिलवाले (२८, रा. पाग) हिने घरात कोणीच नसताना दीड वर्षाच्या मुलासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. चिपळूण पोलीस ठाण्यात पती सचिन दिलवाले यांनी खबर दिल्यानंतर कोमलचे पार्थिव कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. परंतु तिचा शवविच्छेदन अहवाल मिळेपर्यंत पोलीसानी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नव्हता. दरम्यान तिच्या भावाने हरकत घेतली होती. त्यामुळे हा गुंता अधिकच वाढला.

दरम्यान तिचा भाऊ ऋषिकेश कुलभूषण निधानकर (३२, बांगर नगर, हिंगोली) याने येथे येऊन आपल्या एकुलत्या एका बहिणीचे २६ मे २०१९ रोजी सचिन दिलवालेबरोबर लग्न झाले होते. सुरुवातीला तिने नोकरी करु नये असे सास-यांनी सांगितले होते. पण नंतर कोमलने नोकरी करावी यासाठी तिच्यावर दबाव सुरु झाला. याच काळात तिला क्रिशू नावाचे बाळ झाल्याने नोकरी करणे अवघड झाले. परंतु सेवानिवृत्त शिक्षक असलेले सासरे माणिक दिलवाले, शिक्षिका सासू कल्पना दिलवाले, पती सचिन दिलवाले व नणंद नंदिनी अलोपे यांनी नोकरी करण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला. त्यातच गाळा खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशाची व सोन्याच्या दागिन्यांची माहेरी मागणी करून तिचा मानसिक छळ केला. या मानसिक दबावामुळे कोमलने आत्महत्या केली आहे. तिला या साऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह, सासू, सासरे व नणंदेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील अधिक तपास करीत आहेत.