एस. टी. महामंडळाच्या सवलतधारी प्रवाशांच्या आरक्षित आसन क्रमांकांमध्ये बदल

१ जानेवारी २०२४ पासून होणार अंमलबजावणी

नरेंद्र मोहिते | राजापूर : प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून दिवसेंदिवस आपल्या सेवा सुविधांमध्ये देखील विवध बदल करत प्रवासीभिमुख सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मग यामध्ये विविध प्रकारच्या नवीन एसटी बस असोत, महिलांना पन्नास टक्के तिकिटात सवलत असो त्याचा एसटीला चांगलाच फायदा देखील होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात एसटी महामंडळ कात टाकतेय असेही बोलले जात आहे. एसटी महामंडळाने अनेक नवीन गाडयाही प्रवाशी सेवेत आणल्या आहेत. तर एसटीच्या प्रवाशी आरक्षण ऑनलाईन सुविधेसह प्रवाशी तिकीट वितरणातही एसटीकडून आता ईलेक्ट्रॅानिक तिकीट ईश्यु मशिनचा वापर केला जात आहे. त्यामुळे आता एसटीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना देण्यात व सवलतधारी प्रवाशांकरीता ठेवण्यात येणाऱ्या एसटीतील आसन क्रमांकांमध्ये बदल केले आहे. तसे परिपत्रक महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतुक विभगाच्या महाव्यवस्थापकांकडून जारी करण्यात आले असून १ जानेवारी २०२४ पासून या बदलरलेल्या आरक्षित आसन क्रमांकाबाबत राज्यातील सर्व आगारांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, अधिस्विकृतीधारक पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग व एसटी कर्मचारी यांना प्रवासभाड्यात सवलन देण्यात येते. महामंडळाच्या साघ्या, निमआराम, विनावानानुकूलित शयनआसनी, शिवशाही आसनी, मिडी, वातानुकूलित, व्होल्वो, शिवाई, विनावातानुकूलित शयनयान अशा बस मध्ये या प्रवाशांकरिता राखीव आसने उपलव्ध करुन दिलेली आहेत.

तर एसटी महामंडळाकडे विविध आसनक्षमतेच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. एसटीने आता नव्याने ऑनलाईन आरक्षण सुविधा व ईलेक्ट्रॅानिक तिकिक इश्यु कार्यप्रणाली अवलंबीली आहे. जुन्या कार्यप्रणालीमध्ये बसेसचे वेगवेगळं सीट लेआऊट उपलब्ध आहेत. आता नवीन कार्यप्रणालीप्रमाणे सवलतीस पात्र असलेल्या या विविध सामाजिक घटकांना विविध बसेसमध्ये आसन क्रमांक देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. सदर तक्रारी निर्माण होऊ नयेत याकरीता आसनव्यवस्थे बाबत नवीन परिपत्रक महामंडळाकडून जारी करण्यात आले आहे. नवीन बस, बदललेली आसन पध्दती यातुन प्रवाशांच्या होणाऱ्या तक्रारी याबाबींचा विचार करून महामंडळाने आता नव्याने ही राखीव आसन आरक्षण पध्दत अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्याने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये आता साध्या गाडीतुन प्रवास करताना दिव्यांग प्रवाशांसाठी यापुर्वी असलेल्या ४७, ४८, ४९ व ५० या चार आसनांमध्ये आता बदल करून त्यांच्यासाठी ३, ४, ५ व ६ क्रमांकाचे तर निमआराम गाडीत ३ व ४, शिवाई व शिवशाही बस मध्ये ३, ४ ५ व ६ आस आरक्षित रहाणार आहेत. विधानमंडळ सदस्यांसाठी यापुर्वी एसटीच्या सर्व गाडयांमध्ये १ व २ आसन क्रमांक राखीव होता त्यात बदल करून आता ७ व ८ क्रमांकाचे आसन आरक्षित रहाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी यापुर्वी साध्या गाडीमध्ये ३, व ५ तर निमआराम बसमध्ये ३ व ४ आसन राखीव होते. आता जेष्ठ नागरिकांसाठी सर्व गाडयांमध्ये ११ व १२ ही दोन आसने आरक्षित रहाणार आहेत. स्वातंत्र सैनिकांसाठी यापुर्वी साध्या गाडीत ६ व ७ क्रमांकाचे आसन आरक्षित होते त्यात आता बदल झाला असून त्यांच्यासाठी १३ व १४ ही दोन आसने आरक्षित रहाणार आहेत. महिलांना यापुर्वी साध्या व निमआराम या दोन गाडयांमध्ये आसन आरक्षित होते. यामध्ये साध्या गाडीत १३ ते १८ अशी सहा आसने आरक्षित होती. आता या गाडीत त्यात बदल होऊन १९ २०, २१ व २२ व २९, ३० ही आसने आरक्षित रहाणार आहेत. तर महिलांना निमआराममध्ये यापुर्वी असलेल्या ५, ६ , ११, १२ व १३ ऐवजी १९, २०, २१, २२ व २९ अशा पाच आसनांचे आरक्षण रहणार आहे. तर आता महिलांना नव्याने शिवशाही व शिवाई या गाडयांमध्ये देखील १९, २०, २१, २२ व २९ अशा पाच आसनांचे आरक्षण रहणार आहे.

 

तर अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी यापुर्वी साध्या गाडीमध्ये २५ व २६ होते त्या ऐवजी आता २७ व २८ क्रमांकाचे आसन आरक्षित रहाणार आहे. पुर्वी हे आरक्षण केवळ व साध्या व निमआराम बस मध्येच मर्यादीत होते. त्यात बदल करून आता नव्याने अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी शिवशाही व शिवाई या गाडयांमध्ये देखील २७ व २८ अशी दोन आसने राखीव असणार आहेत. महाराष्ट्र राज्य महामार्ग कर्मचाऱ्यांसाठी यापुर्वी साध्या गाडीत २३ व २४ क्रमांकाचे आसन आरक्षित होते त्यात बदल करून ते ३१ व ३२ करण्यात आले आहे. मिडी बसेस, विनावातानुकूलित शयनआसनी, शिवनेरी व ई-शिवनेरी बसेस मधील सवलतधारी प्रवाशांच्या आसन क्रमांकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या बदल करण्यात आलेली आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलबजावणी दिनांक १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येणार आहे. आरक्षित बसमध्ये सवलतधारी प्रवाशांकरीता ठेवण्यात आलेली आरक्षित आसने ही आरक्षणासाठी उपलब्ध राहतील. मात्र बस सुटण्याच्या वेळेपूर्वी २४ तास सदर आसने विनासवलतधारक प्रवाशांकरीता उपलब्ध राहतील.

सर्व अनारक्षित बसमधील आसनांकरीता सर्व सवलतधारी प्रवाशांकरीता ठेवण्यात आलेली आरक्षित आसने ही गाडी सुटण्याच्या वेळेपर्यंत सुरुवातीच्या ठिकाणी उपलब्ध राहाणार आहेत. बस मार्गस्थ झाल्यावर या आसनांवर सलवतीधारक प्रवाशांना हक्क सांगता येणार नाही. याबाबत १ जानेवारी पासून सर्व आगार प्रमुखांनी अंमलबजावणी करावी, तशा बदल झालेल्या आरक्षण आसनाबाबतचे स्टीकर गाडयांमध्ये लावावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.